नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ गुरुतेगबहादुर साहिबजी यांचा 350 वा ऐतिहासिक शहीदी समागम संपन्न

नांदेड, २५ जानेवारी २०२६ : गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरू तेग बहाद्दुर यांचे पुण्यस्मरण केले. शिख पंथाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडच्या मोदी मैदानावरील या भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
गुरू तेग बहाद्दुरांचा पराक्रम, वीरता, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.
मुघल बादशाह औरंगजेबाच्या आदेशावरून गुरुतेगबहादुर यांची हत्या करण्यात आली होती. श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांचा त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय व सकल हिंदू समाज प्रथमच लाखोच्या संख्येत नांदेड या ठिकाणी एकत्र आले.
सर्वांना मिळून धर्मांतराच्या विरोधात जागरण करावे लागेल – शरद ढोले
या कार्यक्रमात बीज भाषणात बोलताना शरद ढोले यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले या समागमाचे बीज शीख समाजातील व बंजारा समाजातील संतांच्या उपस्थितीत बंजारा कुंभाच्या वेळी रोवले गेले होते. बंजारा, लभाना, नायकडा, शीख, सिकलकर समाजात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत होते. त्याबद्दल संतांनी, धर्मगुरूंनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे सर्वांनी मिळून असे ठरवले की गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास समाजात पोहचणे, समाजाचे जागरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे ह्या समागमाचे आयोजन झाले.
गुरुतेगबहादुरजी यांचे बलिदान हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हे बलिदान कदापि विसरू नका – बाबा हरनाम सिंह

याप्रसंगी बोलताना बाबा हरनमसिंह म्हणाले गुरु तेगबहादुर यांचे बलिदान हिंदू धर्माच्या रक्षणासाठी झाले. जेव्हा इस्लामिक आक्रमणकारी मानवतेला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी गुरु तेगबहादुर साहिबजी आणि शिखांनी बलिदान दिले. इस्लामिक आक्रमकांनी अत्यंत हाल हाल करून गुरूंची हत्या केली. परंतु त्यांनी मृत्यू स्वीकारला पण धर्म सोडला नाही. त्यांच्या बलिदानामुळे हिंदूंचे धर्मांतर होऊ शकले नाही. त्यामुळे इस्लामिक आक्रमकांनी केलेला अन्याय आणि १९८४च्या शीख अत्याचाराला कधीही विसरू नका असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकारच्या या ऐतिहासिक शहीदी समागम नियोजनासाठी त्यांनी आभार मानले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, नवी दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा मंत्री सरदार मनजिंदर सिंघ सिरसा, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ.अजित गोपछडे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार जितेंद्र अंतापूरकर, आमदार रवींद्र चव्हाण, राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, गुरूव्दारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ, शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यावेळी उपस्थित होते. शीख समाजाचे संत गुरुद्वारा हुजुरसाहेब नांदेडचे बाबा बलविंदर सिंग, दमदमी टकसालचे बाबा हरनाम सिंग, बंजारा समाजाचे संत बाबुसिंग महाराज, ह.भ.प. संजय महाराज पाचपोर व अनेक साधु-संत उपस्थित होते.



गुरू तेग बहाद्दुरांचा पराक्रम, वीरता, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.