विवेक विचार मंचच्या हस्तक्षेपानंतर वरावरा रावच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रम रद्द

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठात जहाल नक्षलवादी वरवरा राव याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात विवेक विचार मंचाला अखेर यश आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी “Civilisation Seminar Series” अंतर्गत “An Electric Wire is Better than a Poet: The Poetry of Varavara Rao” या शीर्षकाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदर कार्यक्रमात UAPA अंतर्गत गुन्हे दाखल असलेले, नक्षलवादी विचारसरणीशी संबंधित आरोपी वरावरा राव याच्या लेखन व विचारसरणीचा गौरव केला जाणार होता. त्यामुळे विवेक विचार मंचाच्या वतीने यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आले व हा कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली गेली. विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कार्यक्रम रद्द केला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोरेगाव भीमा, एल्गार परिषद केस प्रकरण (RC-01/2020/NIA/MUM) मध्ये वरवरा राव आरोपी असून आणि सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या जामिनावर बाहेर आहे अशी माहिती समोर आली आहे.

भारतात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही बंदी घालण्यात आलेली व दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहे. या हिंसक चळवळीमुळे हजारो नागरिक व सुरक्षारक्षकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा चळवळीच्या विचारसरणीचे उदात्तीकरण करणारा कार्यक्रम घेणे हे राष्ट्रीय अखंडता व सुरक्षेसाठी गंभीर आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये अशा अतिरेकी विचारसरणीला व्यासपीठ देणे अनुचित व संतापजनक आहे अशी भूमिका विवेक विचार मंचाच्या वतीने मांडण्यात आली आहे.
विवेक विचार मंचच्या वतीने संबंधित विद्यापीठच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले व ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांची चौकशी करून कारवाईची मागणीही करण्यात आली. याची तात्काळ दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने सदर कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती दिली. यावेळी मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे, मुंबई महानगर संयोजक जयवंत तांबे व विधिज्ञ ॲड. संदीप जाधव उपस्थित होते.

