
मुंबई, दि. 9 मार्च : आपल्याला विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्याचा मार्ग महिला सक्षमीकरणातून जातो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात. जगाच्या पाठीवर ज्या विकसित राष्ट्रांनी आपल्या नारीशक्तीची ताकद ओळखली, त्या राष्ट्रांच्या अर्थचक्राला गती प्राप्त झाली, त्यांचा विकास झाला आणि त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम राबवत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम ‘सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र’ येथे देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सक्षमपणे उभ्या राहिलेल्या महिलांचा सन्मान केला.

महाराष्ट्रातही मुलींना 100% मोफत उच्च शिक्षण, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ व इतर योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षात लाखो लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवलं आहे. 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवायचे आहे. यासह 1 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे शासनाचे लक्ष्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष ‘महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे, त्यामुळे राज्य शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना घोषित केल्या असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला राजमाता जिजाऊ माँसाहेब, महाराणी ताराबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या महान स्त्रियांचा गौरवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्याचे कार्य आज महाराष्ट्रातील स्त्रीशक्ती समर्थपणे करत आहे. कला, शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्रात महिला भगिनी उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहेत, याचा मला अभिमान आहे.
महिलांचा सन्मान म्हणजे केवळ शब्दांनी गौरव करणे नव्हे, तर त्यांच्या भावना, स्वप्नं आणि आकांक्षांना मान देणे आहे. घरात असो किंवा समाजात; महिलांना समान संधी, सुरक्षित वातावरण आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे हेच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण आहे असे मत सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महिला व बालविकास विभागाच्या वतीने राज्यातील महिलांच्या व बालकांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जातात. अनाथांना 1% आरक्षण असो, मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवणे असो, वन स्टॉप सेंटर्स / सखी सेंटर्स / शक्ती सेंटर्स अशा विविध सुविधांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनाही आजच्या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील एकल महिलांना आधार देण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वात 3 महिन्यांपूर्वी एक बैठक संपन्न झाली होती. नुकताच झालेल्या अर्थसंकल्पात एकल महिलांसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा करून अजितदादांच्या इच्छेला मूर्त रूप दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच 8 मार्च या महिला दिनाचे औचित्य साधून महिलांची समानता, सक्षमीकरण व विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करूया असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

