समाजपरिवर्तनाचे वैयक्तिक यशस्वी प्रयोग समाजव्यापी व्हावेत : अतुल लिमये

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे शनिवारी पूजनीय श्रीगुरूजी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. अजित मराठे, दादा लाड, डॉ. अभय फिरोदिया, महंत श्री भारतभूषणदासजी महाराज, स्वामी प्रकाशानंद, अतुल लिमये आणि रविंद्र वंजारवाडकर (स्थान : सिंबायोसिस अभिमत विद्यापीठ, विमानगर, पुणे)

पुणे, दि. १४ फेब्रुवारी : “समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे. शासनावर अवलंबून न राहता काम उभे करणे ही काळाची गरज आहे. तसे झाल्यास अशा प्रयोगांतूनच खऱ्या अर्थाने व्यवस्था परिवर्तन घडून येईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी शनिवारी येथे केले.

अतुल लिमये, सह-सरकार्यवाह, रा. स्व. संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे आयोजित ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात संशोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार दादा लाड यांना, तर समाजप्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यवाह राजन गोऱ्हे यांनी स्वागत केले.

अतुल लिमये पुढे म्हणाले, “समाजाचे शासनावरील अवलंबित्व वाढत चालले असून, यामुळे समाज अपंग बनण्याची भीती आहे. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी समाज बदलवणाऱ्या यशस्वी प्रयोगांचा अनुकरणीय आराखडा तयार करून आदर्श कार्यप्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. विकसित भारताच्या दिशेने जाण्यासाठी हे कार्य अनिवार्य आहे.”

अभय फिरोदिया, अध्यक्ष, फोर्स मोटर्स

“आजकाल अनेक लोक हिंदुत्वाबद्दल मनात कटुता बाळगून असल्याचे चित्र दिसत आहे,” असे मत अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,

“भारतातील बौद्ध, जैन, शीख आणि वैदिक यांची एकत्रित परंपरा म्हणजेच हिंदुत्व होय. हिंदू धर्म ही एक जीवनपद्धती आणि विचारधारा असून, तिला प्रत्यक्ष कृतीत आणण्याची प्रक्रिया म्हणजे हिंदुत्व होय. जनकल्याण समिती समाजाच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या लोकांना संघटित आणि कार्यान्वित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.”

“मूल्यांची समज म्हणजेच धर्म होय. जोपर्यंत आजची पिढी नैतिक मूल्यांची कास धरून चालेल, तोपर्यंत धर्म अबाधित राहील,” असेही फिरोदिया यांनी नमूद केले.

आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज

आचार्य श्री महंत भारतभूषणदास महाराज आपल्या मनोगतात म्हणाले,

“सनातन परंपरा आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. समाजाला वैभवशाली बनविण्यासाठी व्यावहारिक कार्याबरोबरच आत्मिक शांतीसाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूल्यमापन बाहेर राहून करता येणार नाही, त्यासाठी संघात प्रत्यक्ष सहभागी व्हावे लागेल.”

दादा लाड यांनी कापूस हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे नव्हे, तर वैभवाचे पीक असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले,

श्रीरंग देवबा (दादा) लाड, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, भारतीय किसान संघ

“विदर्भातील आत्महत्यांना दुर्दैवाने कापूस पिकाशी जोडले गेले. वास्तव पाहता, संपूर्ण जगाला कापडाची देणगी देणाऱ्या भारताचे कापूस हे मुख्य नगदी पीक आहे. कापसाचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर बोंडाचे वजन वाढणे गरजेचे आहे. मी कापूस पिकाची ‘गळफांदी’ काढून ‘फळफांदी’ लांबवण्याचे तंत्र विकसित केले. यामुळे कापसाच्या एका बोंडाचे वजन १० ग्रॅमपर्यंत वाढले आणि पर्यायाने एकरी उत्पन्न ४ ते ५ क्विंटलवरून थेट १५ क्विंटलपर्यंत पोहोचले.”

चिंचवडच्या पूर्वांचल छात्रावासमधील विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. सेवा भारती संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव प्रदीप सबनीस यांनी आभार मानले. प्रा. डॉ. प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

 

एक कोटींची देणगी :
जनकल्याणाच्या कामाला प्रोत्साहन देणे, मदत करणे असे महत्त्वपूर्ण काम जनकल्याण समिती करत आहे. समाजाच्या उत्कर्षाचे हे फार मोठे साधन आहे, अशा शब्दात जनकल्याण समितीच्या कार्याचा गौरव डॉ. अभय फिरोदिया यांनी केला. या कार्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची देणगी देत असल्याचे यावेळी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *