
गाझियाबाद, दि. 22 फेब्रुवारी : स्वावलंबी, निर्भय,आत्मविश्वासू आणि चारित्र्यसंपन्न युवा हे कोणत्याही राष्ट्राची अमूल्य धरोहर असतात. तसेच ज्याच्यात उत्साह आणि विवेक यांचा समतोल आहे तोच खरा युवा आहे. सकारात्मक विचारातून मिळणारी ऊर्जा ही तरुणांसाठी सर्वात मोठी भांडवल असते. अशा व्यक्तींचा निर्माण करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे असे राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताकुमारी यांनी म्हटले आहे. राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी व प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीच्या समारोप सत्रात शांताकुमारी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले, त्या वेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की , “स्त्री आणि पुरुष हे एकाच तत्वाचे अंश आहेत” हाच हिंदू विचार आहे. उपनिषदांमध्येही याचा उल्लेख आहे. सशक्त नेतृत्व, जबाबदार नागरिकत्व आणि सुसंघटित समाज अशा प्रकारच्या त्रिशक्तीचे समाजात जागरण करणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी ऊर्जा-वाहक बनून समाजहितासाठी सतत क्रियाशील राहिले पाहिजे.

गाझियाबादच्या कैलास मानसरोवर परिसरात २१ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या बैठकीच्या समारोपात प्रमुख कार्यवाहिका ए. सीता यांनी बैठकीत चर्चिलेल्या कार्यस्थिती, पूर्ण केलेले विशेष कार्यक्रम आणि पुढे करावयाच्या कार्ययोजनेचे विवरण देताना सांगितले की आज समाज आणि परिवारात हिंदू विचारांसाठी अनुकूलतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सामूहिकता आणि अनुशासनाचे पालन करत समाजपरिवर्तनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या बैठकीत देशातील ३८ प्रांतांमधून १०८ प्रतिनिधी उपस्थित होते.

