
पुणे, दि. ११ डिसेंबर : जगात वाईटाच्या तुलनेत चांगले प्रसंग असंख्य पटीने घडत असतात. पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचविणारी ‘एकशः सम्पत’सारखी पुस्तके मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावीत आणि समाजापर्यंत पोहोचवावीत, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. प्रेरक लेखक व मुक्त पत्रकार दत्ता जोशी लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अनुवादक आणि ‘साहित्य भारती’च्या प. महाराष्ट्र प्रांत अध्यक्षा उमा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार व ‘विश्वसंवाद केंद्रा’चे प. महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष अभय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुण्यातील स्वा. सावरकर अध्यासन सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात बोलताना हिरेमठ यांनी दत्ता जोशी यांच्या लेखनशैलीची प्रशंसा केली आणि संघाच्या संदर्भात त्यांनी या पुस्तकात केलेली मांडणी वाचनीय आणि महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अशा प्रकारचे विचारमंथन मोठ्या प्रमाणात व्हावे, असेही ते म्हणाले.
एक पत्रकार म्हणून आपण दत्ता जोशी यांच्या लेखनाचे चाहते आहोत असे सांगत अभय कुलकर्णी यांनी या पुस्तकातील लेखनाविषयी विवेचन केले आणि संघ स्वयंसेवक व पत्रकार म्हणून आपल्याला देशभरात आलेल्या विविध अनुभवांचा उहापोह आपल्या भाषणात केला. उमाताई कुलकर्णी यांनी राष्ट्रीय विचारांतून निर्माण होणार्या साहित्याकडे आता चांगल्या दृष्टीने पाहिले जात असल्याचे स्पष्ट करतानाच डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या लेखनशैली व भूमिकेवरही प्रकाश टाकला.
आपण संघ संस्कारात घडलो आणि त्याच विचारांच्या उर्मीतून प्रसवलेले विविध विषय मागील अनेक वर्ष सोशल मीडिया वरून शेअर केले… संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने यातील प्रातिनिधिक स्वरूपात निवडलेले लेखन एका पुस्तकाद्वारे समाजासमोर मांडावे या कल्पनेतून एकश: संपत् या पुस्तकाचा जन्म झाला असल्याचे सांगत लेखक दत्ता जोशी यांनी संघ शताब्दी वर्षात अशा प्रकारच्या चार पुस्तकांच्या निर्मितीचा आपला संकल्प जाहीर केला.
या प्रसंगी विक्रीसाठी सवलतीत ठेवलेली पुस्तके ‘सेल्फ सर्विस’ प्रकारे विकली गेली. विक्रीसाठी कुठलीही व्यक्ती उपस्थित नव्हती. वाचकांनी तेथे ठेवलेल्या डब्यात पैसे टाकून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून मूल्य दिले आणि हवी तेवढी पुस्तके विकत घेतली.

