भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारे 34 वे Dipex यंदा पुण्यनगरीत आयोजित होणार

पुणे, दि. २८ मार्च : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सुजन व कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजfत डिपेक्स 25, दिनांक 3 ते 6 एप्रिल 2025 रोजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर संपन्न होणार आहे.

डिपेक्स 2025 नगरीला भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे नाव तसेच प्रदर्शनीला पद्मविभूषण स्वर्गीय रतन टाटा प्रदर्शनी असे नाव देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्यातील डिप्लोमा अभियांत्रिकी कृषी आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चल प्रकल्पांचे प्रदर्शन व स्पर्धा डिपेक्सच्या माध्यमातून घेतली जाते.
डिप्लोमा अभियांत्रिक कृषी शिक्षण घेताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प समाजभिमुख असावेत त्या प्रकल्पांचा समाजातील विविध घटकांना उपयोग व्हावा या तंत्रज्ञानाच्या मार्फत ग्रामीण जीवन सुधारण्यास मदत व्हावी या हेतूने 1986 साली डिपेक्सची सुरुवात झाली.

डिपेक्स ची सुरुवात ही नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी प्रतिभा प्रदर्शन करण्यासाठी तसेच, महाराष्ट्रातील विद्यार्थींना सर्व समावेशक व्यासपीठ प्रदान करणे, तरुणांमध्ये तंत्रज्ञानासोबत उद्योजकतेची भावना निर्माण करणे, शैक्षणिक क्षेत्र, समाज आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे व समाज ज्या समस्यांना सामोरे जातो त्यावरील निराकरणासाठी विद्यार्थ्यांनी उपाय शोधावेत हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून डिपेक्सची सुरुवात झाली.

डिपेक्स 2025 वैशिष्ट्ये

– 2000 प्रोजेक्टची नोंद झाली आहे

– महाराष्ट्रातील 11 स्थानांवर आयडिया प्रेझेंटेशनची प्राथमिक फेरी झाली

– 5000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला

– 400 अधिक प्रकल्प व 2000 विद्यार्थी प्रत्यक्ष Dipex25 पुणे येथे होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत

– यावर्षी होणारे डिपेक्स 11 थीम मध्ये घेण्यात येणार आहे

• कृषी तंत्रज्ञान • संगणकीय बुद्धिमत्ता • संरक्षण आणि सायबर सुरक्षा • ऊर्जा • आरोग्य सेवा/वैद्यकीय तंत्रज्ञान • औद्योगिक ऑटोमेशन • गतिशीलता • सुरक्षितता • शाश्वत नागरी पायाभूत सुविधा • कचरा व्यवस्थापन • ओपन इनोवेशन या थीम मधून विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट नोंदविले आहेत.

डिपेक्स 2025 मध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातील 38 जिल्ह्यांमधून, 191 डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालयातून 324 प्रकल्प तसेच महाराष्ट्रातील आयटीआय मधील शंभर सर्वोत्तम प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात केला गेला आहे,

पुण्यामधील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी, नागरिक, उद्योजक, लघु उद्योजक, शैक्षणिक संस्था, इंक्युबॅशन सेंटर मधील एक लाख अधिक लोक या प्रकल्प प्रदर्शनास भेट देणार आहेत.

डिपेक्स 2025 चे उद्घाटन व बक्षिस वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, DRDO चे माजी अध्यक्ष जी. सतीश रेड्डी, AICTE चेअरमन टी. जी. सीतारामन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी उपस्थित राहणार आहेत.

डिपेक्स 2025 मध्ये सहभागकर्त्यांसाठी एकूण नऊ परिसंवादांचे / सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे सेमिनार प्रथित यश उद्योजक व व्यक्तिमत्व घेणार आहेत, सेमिनारसाठी पद्मश्री मिलिंद कांबळे, उद्योजक सुधीर मुतालिक, डीआरडीओचे माजी सायंटिस्ट काशिनाथ देवधर, प्राध्यापक विजय नवले, रामानंद नंद यांचा समावेश आहे.

सर्व अकरा थीम मध्ये प्रथम व द्वितीय पुरस्कार दिले जाणार आहेत, या व्यतिरिक्त काही आकर्षक पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहेत.

डिपेक्स 2025 स्वागत समितीचे अध्यक्ष प्रकाश धोका, स्वागत समिती सचिव प्रसेनजित फडणवीस, स्वागत समितीचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, डिपेक्स 2025 निमंत्रक संकल्प फळदेसाई, अभाविप पुणे महानगर अध्यक्ष डॉक्टर प्रगती ठाकूर, अभाविप पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

यावेळी, डिपेक्सचे स्वागत समिती अध्यक्ष प्रकाश धोका म्हणाले की, भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारे डिपेक्स यावर्षी पुण्यात पार पडत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये डिपेक्सने विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

डिपेक्स स्वागत समिती सचिव प्रसेनजित फडणवीस म्हणाले की, हा डिपेक्स महाराष्ट्र व गोवा राज्यातील निवडक प्रकल्पांचा एक महाकुंभ आहे असे आपण म्हणू शकतो. याच मैदानावर १२ वर्षांपूर्वी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीमध्ये हा डिपेक्स पार पडला होता. या डिपेक्स मध्ये खऱ्या अर्थाने समाजाभिमुख विषयांवर विज्ञान, तंत्रज्ञान भूमिका व शाश्वत विकास याबाबत विचारमंथन होणार आहे.

डिपेक्स २०२५ निमंत्रक संकल्प फळदेसाई म्हणाले की, यावर्षीच्या ३४व्या डीपेक्स मध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकूण २००३ प्रोजेक्ट्स सहभागी झाले होते यामधून ११ विभागात झालेल्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या सर्वोत्तम ४०० प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या नगर, COEP कॉलेज मैदान, पुणे येथे होणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी DIPEX या प्रदर्शनाला भेट द्यावी व विद्यार्थ्यांनी बनवलेले नवीन संशोधन, प्रकल्प आणि तांत्रिक नवकल्पनांचा महाकुंभ पहावा असे सर्व पुणेकरांना आवाहन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *