पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला : २७ हिंदू पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी

बांगड्या पाहून धर्म विचारला आणि सुरू केला गोळीबार; पंतप्रधान व गृहमंत्र्यांचा तीव्र निषेध, दोषींवर कठोर कारवाईचे संकेत

श्रीनगर, २२ एप्रिल : जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी जिहादी दहशतवाद्यांनी एक भयावह हल्ला घडवून आणला. या गोळीबारात देशभरातून आलेल्या २७ हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

दुपारी सुमारे २.४७ च्या सुमारास ४ ते ५ दहशतवाद्यांनी ए.के.४७ रायफल्ससह बैसरन मैदानात फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांच्या गटावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्याआधी दहशतवाद्यांनी पर्यटक महिला हातातील चुडा पाहून त्यांचे नाव आणि धर्म विचारले आणि नंतर गोळीबार सुरू केला, अशी माहिती एका जिवंत बचावलेल्या पर्यटक महिलेने दिली.

सुरक्षा यंत्रणांची तातडीची कारवाई

हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला. जखमी पर्यटकांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात सघन शोधमोहीम सुरू आहे.

अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या काही आठवडे आधी घडलेल्या या घटनेमुळे, यात्रेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दिल्लीमध्ये तातडीची उच्चस्तरीय बैठक

या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली. गृहसचिव, गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी झाले. परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यांनी तत्काळ गृहमंत्र्यांशी संवाद साधून कठोर कारवाईचे निर्देश दिले.

दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही – पंतप्रधान, गृहमंत्री

ट्विटर (एक्स) संदेशाद्वारे अमित शहा यांनी सांगितले, “पहलगाममधील या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. मृतांच्या कुटुंबियांसोबत मी शोक व्यक्त करतो. दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल.”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या संदेशात हल्ल्याचा निषेध करताना म्हटले, “निष्पाप पर्यटकांवर झालेला हा क्रूर हल्ला अत्यंत निंदनीय आहे.”

पंतप्रधान मोदींनीही आपल्या संदेशात स्पष्ट शब्दांत सांगितले, “जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या या दहशतवादी कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. दोषींना कठोर शिक्षा होईल. दहशतवादाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र आणि निर्णायक ठरेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *