जी 20 शिखर परिषदेच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे निवेदन
गेल्या दोन दिवसांपासून नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 शिखर परिषदेचा आज समारोप झाला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समारोपाचे अध्यक्षीय भाषण केले. गेल्या वर्षभरात जी-20 समुहाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील उपलब्धींचा आढावा त्यांनी घेतला तसेच आगामी काळातील अपेक्षांवरही भर दिला. वसुधैव कुटुम्बकम् या घोषवाक्याचे महत्त्व विशद करतानाच त्यांनी विश्वकल्याणाचाही उल्लेख आपल्या भाषणात केला.
या समारोप सत्रात पुढील वर्षीच्या अध्यक्षपदाची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डिसिल्वा यांच्याकडे सोपवली. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, “Troika भावनेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ब्राझीलला आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली जी-20 आपली सामायिक उद्दिष्टे पुढे नेईल. मी ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लूला-डी-सिल्वा यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी त्यांच्याकडे अध्यक्षपदाची निर्णयहतोडी सोपवतो.”
Productive discussions at the G20 Summit for a better planet… pic.twitter.com/rNSOOHpB5L
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2023
जी-20 च्या अध्यक्षतेची जबाबदारी भारताकडे नोव्हेंबर महिन्यापर्यंत आहे याचा उल्लेख करत पुढील योजनाही पंतप्रधानांनी विशद केली. “भारताकडे नोव्हेंबर पर्यंत जी -20 अध्यक्षतेची जबाबदारी आहे. अजून अडीच महिने शिल्लक आहेत. या दोन दिवसांमध्ये तुम्ही सर्वांनी आपली मते इथे मांडली , सूचना केल्या, बरेच प्रस्ताव मांडले आहेत. ज्या सूचना आल्या आहेत त्या पुन्हा एकदा तपासून त्यांच्या प्रगतीत पुन्हा गती कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करणे ही आता आमची जबाबदारी आहे. आपण नोव्हेंबर अखेर जी -20 शिखर परिषदेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे आणखी एक सत्र ठेवावे असा माझा प्रस्ताव आहे. त्या सत्रात आपण या शिखर परिषदेदरम्यान मांडलेल्या मुद्द्यांचा आढावा घेऊ शकतो.” असे मोदी यावेळी म्हणाले.
यानंतर पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी जी -20 शिखर परिषद संपल्याची घोषणा केली. ही घोषणा करत असताना त्यांनी विश्व कल्याणाचा नवा मंत्र जगाला दिला. ते म्हणाले, “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यचा मार्ग सुखद असेल. ‘स्वस्ति अस्तु विश्वस्य!’ म्हणजे संपूर्ण जगात आशाआणि शांतता नांदो. 140 कोटी भारतीयांच्या या मंगलमय शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार !”