
हरिद्वार, दि. ४ फेब्रुवारी : स्वामी सत्यमित्रानंदगिरी हे राष्ट्रनिर्माण, मानवसेवा आणि सनातन धर्माचा तेजस्वी वारसा आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी सत्यमित्रानंदगिरी यांच्या कार्याचा गौरव केला. फडणवीस यांनी आज हरिद्वार, उत्तराखंड येथे, पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभ येथे उपस्थिती दर्शविली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी सामान्य घरातून आलेल्या पूज्य गुरूदेव श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांचा असामान्य व अद्भुत प्रवास सांगितला, जो खूप महत्त्वपूर्ण आहे.

स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांनी अध्यात्माबरोबरच राष्ट्रनिर्माणासाठीच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार केला. तसेच भारतमातेचे मंदिर उभारून स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांनी सनातन धर्माच्या वेगवेगळ्या विचारांना एकत्र आणण्याचे कार्य केले, कारण विचार जरी अनेक असले, तरी संत त्यांना जोडण्याचे काम करतात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज यांनी समाजामधील दुजाभाव दूर करून सनातन धर्म एकजूट असल्याचे आपल्या कर्तव्यामधून दाखवून दिले. त्यामुळे एक अद्भुत व्यक्तिमत्व म्हणून भारत देश आणि संपूर्ण विश्व त्यांना ओळखते. अशा गुरूंचे समाधी मंदिर व मूर्तीस्थापना समारंभ होणे ही पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात सनातन संस्कृतीचे पुनरुत्थान होत आहे. युवा पिढी ही सनातन विचारांशी जोडली जात आहे. युवा पिढीला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटत आहे, जी आनंदाची बाब आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


