
मुंबई, दि. १० फेब्रुवारी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात स्वीकारला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांचा पदभारही त्यांनी स्वीकारला.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांच्यासह आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांनी याबद्दल आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
https://www.facebook.com/share/p/1DsFBdjkTw/
आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात,
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.
दरम्यान आपला कार्यभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्या गेल्या व त्यानंतर त्यांनी मंत्रालयात आपल्या दालनात आपला पदभार स्वीकारला.

