पुणे, दि. ३ एप्रिल : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज (३ एप्रिल २०२५ ) सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉक्टर आनंद काटीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन स्वतःमध्ये रुजवून आणि जिज्ञासू वृत्ती जोपासून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास घेतला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर आनंद काटीकर यांनी यावेळी केलं. विद्यार्थ्यांनी सातत्याने धडपड केली पाहिजे, नवनवीन गोष्टी केल्या पाहिजेत; असे केल्यास संशोधक दृष्टी निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळते असंही काटीकर यावेळी म्हणाले.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अपारंपरिक ऊर्जेच्या वापराच्या उद्दिष्टाला आपण आपल्यापरीने प्रोत्साहन देत आहोत असे मत शालासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. पर्यावरण पूरक आणि वीज वाचविणे हे राष्ट्रीय कार्य असून या कार्याला आपला हातभार लागणे अगत्याचे असल्याचेही ते म्हणाले.
एम एन जी एल कंपनीच्या सौजन्याने साकारलेल्या या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा यंत्रणा कशाप्रकारे काम करते याची माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचं मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी सांगितलं. २५ किलो वॅट क्षमतेचा हा प्रकल्प असून दररोज यातून १२५ ते १३० युनिटस वीज निर्मिती होत असल्याची माहिती वासंती बनकर यांनी दिली आहे.
वित्त नियंत्रक जगदीश लांजेकर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रसाद लागू, निरंजन काळे, शिक्षक पालक संघातील सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.
अक्षय कुलकर्णी, सोनल एरंडे, दीप्ती यादव यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर मधुरा बापट यांनी आभार मानले.