दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे : डॉ. हिरेमठ


पुणे – दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने न पाहता सन्मानाने पाहिले जात आहे. दिव्यांगांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे सन्मानाने स्वतःचा रोजगार करावा. तसेच इतरांनाही रोजगार देण्यासाठी सक्षम व्हावे असे आवाहन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले.

सक्षमचे पुणे महानगराचे एक दिवसीय अधिवेशन नुकतेच भावे प्रशालेत पार पडले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दिव्यांगांनी इच्छाशक्तीच्या बळावर अनेक असामान्य कामे उभी केली आहेत आपणही ते आदर्श डोळ्यासमोर ठेऊन दिव्यांगांना मूळ प्रवाहात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे.

यावेळी दिव्यांग कायदा दशा व दिशा याविषयी बोलताना ॲड. प्रीती सिंग परदेशी यांनी दिव्यांग कायद्याबद्दल माहिती दिली. हा कायदा म्हणजे दिव्यांगांसाठी उपकार नसून तो त्यांचा हक्क आहे. या कायद्यान्वये दिव्यांगांना समानता, समान शिक्षण तसेच रोजगार कसा प्राप्त करता येईल याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. दिव्यांगांवर होणारे अत्याचार प्रतिबंधित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष न्यायालयाची स्थापना केलेली आहे. तसेच या कायद्यान्वये दिव्यांगांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत राखीव जागा देणे, बस थांबे सुकर बनवणे या गोष्टी बंधनकारक आहेत हे सांगितले. दुसऱ्या सत्रात माजी समाज कल्याण अधिकारी नंदकुमार फुले यांनी दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली.

यावेळी उमेद फाउंडेशन निर्मित हम किसीसे कम नही हे नाटक दिव्यांगांनी सादर केले. स्वयंरोजगार आणि उद्योजकता या विषयावर वर्षा रोकडे यांनी मार्गदर्शन केले. अनिल वळसंगकर यांनी यशस्वी दिव्यांग उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या व त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर मात कशी केली याची माहिती घेतली.

आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्या दिव्यांगांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच अपंग लेप्रसी पुनर्वसन व युवक संघटना, सद्गुरु साईबाबा ट्रस्ट (सी आर रंगनाथन कर्णबधिर महाविद्यालय) एकलव्य फाउंडेशन,अनुग्रह फाउंडेशन,जनकल्याण रक्तपेढी अशा दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या संस्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला.

यावेळी अमोल शिनगारे यांनी सक्षम गीत गायले. गहिनीनाथ नलावडे यांनी संघटन मंत्र सांगितला. दिव्यांग कल्याणकारी केंद्राच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणले. दत्ता लाखे यांनी प्रास्ताविक करून सक्षमचा परिचय करून दिला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुख शैलेंद्र बोरकर, सक्षमचे महानगर अध्यक्ष डॉक्टर संजीव डोळे, दशरथ जाधव उपस्थित होते. या अधिवेशनासाठी18 पेक्षा जास्त दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था, 125 पेक्षा जास्त दिव्यांग व त्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *