सातारा, दि. १५ सप्टेंबर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने समाजातील वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा “‘सामाजिक संवाद मेळावा” सातारा मध्ये संपन्न झाला.
या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय तसेच अन्याय अत्याचारच्या विविध घटना, घडामोडी, शासकीय योजना, धोरण अशा विषयासंदर्भात चर्चा – संवाद झाला. मेळाव्यात उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या अनेक विषयांवर मते व्यक्त केली.
मेळाव्याची सुरुवात संविधान सरनामा वाचनाने झाली. मुधुताई कांबळे यांनी संविधान सरनाम्याचे वाचन केले,तर विवेक विचार मंचाचे जिल्हा संयोजक राजेश सातपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी मंचावर उपस्थित विवेक विचार मंचाचे राज्य कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतीय संविधान किती मजबुत आहे व ते कुणीही बदलु शकत नाही,याचबरोबर समाजातील अन्याय अत्याचाराच्या घटना, शासकीय योजनांची माहीती, आरक्षण इ. विषयावर सखोल भुमिका मांडली.
यावेळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते ॲड. संदिप जाधव यांनी संविधान बदलासंबधीच्या अफवा कशा चुकीच्या आहेत,ते न्यायिक दृष्टीकोनातून कशा चुकीच्या आहेत हे उदाहरणे देऊन सांगितले.
सुनिल सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तर रणजित कसबे यानी अभार प्रदर्शन केले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.