सोलापूर, दि. २७ जून : बाराव्या शतकापासून सातत्याने चालणाऱ्या मंगलकारी परंपरेमध्ये मंदिरे ही समाजाची केंद्रे आहेत. या परंपरेच्या निर्वहनासाठी श्रद्धेची, संस्काराची शिदोरी पिढी दर पिढी सातत्याने मिळत आल्याने समाज उत्तमरित्या जगत आला आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानला भेट देऊन सरसंघचालक भागवत यांनी शिवयोग समाधीचे दर्शन घेतले. मुख्य गाभाऱ्यात भागवत यांनी पूजा करून श्री सिद्धेश्वर महाराजांची आरती केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले की, वर्तमान परिस्थितीमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव कुटुंबसंस्थेला बाधक ठरत आहे. कमी वयात किशोरवयीन मुलांना ड्रगचे व्यसन लागत आहे. ड्रग सेवन बाबतच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सुशिक्षित कुटुंबातील संस्काराच्या उणीवांमुळे अशा प्रवृत्ती सर्वसाधारणपणे सगळीकडे दिसत असल्याचे सांगितले. हे संकट दूर करायचे असेल तर अशा परंपरेने आलेल्या श्रद्धा आणि संस्कारांना घेऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक कुटुंबात संवाद घडवून आणत कुटुंब प्रबोधन करण्याची नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले. देवस्थानाच्या नोंदवहीत त्यांनी अभिप्राय नोंदवत “आत्मनो मोक्षार्थं जगद्धितायच” अशा शुभकामना दिल्या.
यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान अध्यक्ष धर्मराज काडादी, सी.ए. सुनील इंगळे यांनी सरसंघचालक भागवत यांचे स्वागत केले. देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज यांनी देवस्थानचे उपक्रम तसेच ग्रामदैवताची यात्रा याबाबत माहिती दिली.
याप्रसंगी गुरुराज हब्बू, राजेश हब्बू, यांनी शिवयोग समाधीची माहिती दिली. हब्बू पुजारी मंडळ यांच्यावतीने डॉ. भागवत यांचा सत्कार करण्यात आला.