अक्कलकोट, दि. २४ जून : श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झाले आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या कार्याचा विस्तार संपूर्ण देशात आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट दिली. ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे आपण अत्यंत प्रभावित झालो असे ते म्हणाले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या गाभारा मंडपात सरसंघचालक मोहन भागवत यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या आध्यात्मिक कार्याची दखल घ्यावी असेच कार्य आहे. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या देशभरातील मान्यवरांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
महेश इंगळे यांच्या नेतृत्वातून मंदिर समितीच्या धार्मिक व आध्यात्मिक कार्याने संपूर्ण राष्ट्रात धर्म, संस्कृती, आध्यात्मास गतिशील चालना देण्यास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अग्रेसर असल्याचे मनोगतही भागवत यांनी याप्रसंगी व्यक्त केले. समाधी मठ, वटवृक्ष देवस्थान अन्नछत्र आणि शिवपुरी येथे भागवत यांनी भेट दिली.