माऊलींचा सोहळा माळशिरस मुक्कामी

अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य

रेखीव रिंगण सोहळ्यात, अश्व दौडले चौखूर।टाळ मृदुंगाच्या गजरात, निनादले विठ्ठलाचे गोपुर।।
रेखीव रिंगण सोहळ्यात, अश्व दौडले चौखूर। टाळ मृदुंगाच्या गजरात, निनादले विठ्ठलाचे गोपुर।।

माळशिरस, दि. १ जुलै : आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळमृदुंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचे नादब्रह्म या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय. वैष्णवांच्या या नादब्रह्माने जणु विठ्ठलाचे गोपुर निनादल्याचा भास झाला. पुरंदावडे गावच्या हद्दीत अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सायंकाळी हा सोहळा माळशिरस मुक्कामी विसावला. उद्या दि. २ रोजी हा सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ होईल.

आज पहाटे कर्णा झाल्यानंतर अवघे वैष्णवजन लगबगीने पालखी तळावर जमा झाले. माऊलींच्या तंबूत प्रमुख विश्‍वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी माऊलींची नैमित्तिक पूजा सुरू केली. ही पूजा चालू असतानाच टाळाच्या साथीने विणेच्या झंकारीत पहाटेचे काकडा सुरु होता. पवमान पूजा झाल्यानंतर माऊलींची आरती करण्यात आली. माऊलींच्या पादुका माळशिरस मुक्कामासाठी पालखीत विराजमान करण्यात आल्या. माऊली माऊली नामाच्या जयघोषात खांदेकर्‍यांनी लिलया पालखी खांद्यावर घेतली. एक एक दिंड्या क्रमांकाप्रमाणे उभा राहू लागल्या. माऊली रथात विराजमान झाल्यानंतर सकाळी ६:३० वाजता सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला.

सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या सकाळच्या सुखद वातावरणातच वैष्णवांनी पंढरीची वाट धरली. सकाळी ८:३० वाजता सोहळा मांडवे ओढा येथे पोहोचला. येथे माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला व वारकर्‍यांनी दुपारचे भोजन उरकले. अडीच तासाच्या विश्रांतीनंतर सकाळी ११ वाजता सोहळा पहिल्या गोल रिंगणासाठी सदाशिवनगर नजीक पुरंदावडे गावच्या हद्दीकडे मार्गस्थ झाला. सदाशिवनगर येथे सोहळा पोहोचल्यानंतर माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सरपंच विरकुमार दोशी, उपसरपंच विष्णू भोंगळे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजीत डुबल, संचालक यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले.

दुपारी १२:३० वाजता माऊलींचे अश्‍व तर १ वाजता लाखो वैष्णवांसह माऊलींचा पालखी सोहळा पुरंदावडे येथे पोहोचला. सरपंच राणी मोहिते, उपसरपंच देवीदास ढोपे व ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. रथापुढील २७ तर रथामागील २० अशा सुमारे ४७ दिंड्या रिंगणासाठी रिंगणस्थळी पोहोचल्या. पोलिसांनी आळंदी देवस्थान कर्मचाऱ्यांच्या मदतीने आखीव रेखीव रिंगण तयार केले होते. रिंगणाच्या मध्यभागी पालखी ठेवण्यासाठी छोटासा मंडप टाकण्यात आला होता. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पादुकांची व अश्वांची पूजा करण्यात आली व रिंगण सोहळ्यासाठी अश्व रिंगणामध्ये आणण्यात आले.

अश्‍वांची नेत्रदीपक दौड

माऊलींच्या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने माऊलींची पूजा बांधली जाते. रिंगण सोहळा ही एक पूजा आहे. समाजातील सर्व थरातील लोक एकत्र येऊन ही विश्‍व माऊलींची पूजा बांधतात. टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्‍वांचे रिंगण सुरू होते व या रिंगणाच्या माध्यमातून माऊलींचे विश्‍वरूप दर्शन वारकर्‍यांना होते. पुरंदावडे येथील हा नेत्रदीपक रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. कधी पाऊस कोसळेल याचा नेम नव्हता. दुपारी १:१० वाजता रिंगण सोहळ्यास सुरूवात झाली. जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला २ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या माऊली व स्वाराच्या अश्‍वांना रिंगणासाठी सोडले. सुरूवातीला काही वेळ स्वाराचा अश्‍व थबकत धावला. स्वाराचा अश्व मात्र त्याला प्रोत्साहित करीत होता. त्यानंतर माऊलींच्या अश्‍वाने नेत्रदीपक दौड करीत स्वाराच्या अश्‍वाला अर्ध्या फेरीतच मागे टाकत तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी माऊलीऽऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करून हा रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवित सोहळ्याचा आनंद लुटला. आज माऊलींचा अश्‍व चौखूर उधळला. या अश्‍वाला आवरताना सेवकांची मात्र दमछाक झाली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यांमधून हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी हे मैदानी खेळ रंगले. त्यानंतर चोपदारांनी उडीच्या कार्यक्रमासाठी दिंड्यांना निमंत्रित केले. माऊलींना मध्यभागी घेवून या दिंड्यांमध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीने आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्मचा उडीचा खेळ रंगला. सर्व वारकरी श्‍वास रोखून या नादब्रह्मात तल्लीन होऊन गेले होते.

पुरंदावडे येथील रिंगण सोहळा झाल्यानंतर श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा माळशिरसकडे मार्गस्थ झाला. सोहळा येळीव येथे अर्ध्या तासाच्या विश्रांतीसाठी विसावला. त्यानंतर तो माळशिरसकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी समाज आरतीनंतर हा सोहळा विसावला.

आज पालखी वेळापूरात

उद्या दि. २ रोजी हा पालखी सोहळा सकाळी वेळापूरकडे मार्गस्थ होईल. सकाळी खुडूस फाटा येथे गोल रिंगण, वेळापूरजवळ धावा व मानाचे भारूडाचा कार्यक्रम झाल्यानंतर सोहळा वेळापूर मुक्कामी विसावेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *