संजय राऊत यांचा माफीनामा, दादा भुसेंनी मागे घेतला अब्रुनुकसानीचा दावा

गिरणा साखर कारखान्यातील शेअर होल्डर्स, शेतकरी बांधव तसेच सर्व मालेगावच्या जनतेची संजय राऊत यांनी मागितली माफी !

 

मालेगाव, दि. २२ फेब्रुवारी : दैनिक सामना मध्ये शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी गिरणा साखर कारखान्याबाबत १७८ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप शिवसेना आमदार व मंत्री दादा भुसे यांच्यावर केला होता. या बातमीमुळे मालेगाव आणि पंचक्रोशीतील शेतकरी सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यावर दादा भुसे व मालेगावातील शेतकऱ्यांच्या वतीने राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र आज राऊत यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हा आरोप पूर्णपणे निराधार व चुकीच्या माहितीतून करण्यात आला होता. आज मालेगावात दादा भुसे व संजय राऊत यांनी एकत्रितपणे माध्यमांना सामोरे जात या प्रकरणावर पडदा पडल्याचे सांगितले. राऊत यांनी दादा भुसे तसेच मालेगावातील शेतकऱ्यांची माफी देखील याप्रसंगी मागितली.

एकेकाळी सहकारातून उभा राहिलेला गिरणा सहकारी साखर कारखाना विक्रीच्या प्रक्रियेत असताना, तो तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा या उद्देशाने सुमारे ११ हजार सभासद शेतकरी एकत्र आले होते. प्रति शेअर ११०० रुपये उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वपक्षीय लोकांनीही या प्रयत्नाला साथ दिली. काही कारणांमुळे अपेक्षित भागभांडवल पूर्णपणे उभे राहू शकले नाही; मात्र जेवढी १.७८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली, ती अधिकृत पद्धतीने आरटीजीएसद्वारे कारखाना खरेदी करणाऱ्या कंपनीकडे वर्ग करण्यात आली. हा सर्व व्यवहार नोंदीनुसार आणि कायदेशीर मार्गाने झालेला होता. मात्र १.८७ मधील पूर्णांक काढून थेट १७८ कोटींच्या अपहाराचा आरोप सामनामधून करण्यात आला होता.

मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, या चुकीच्या आरोपांमुळे मालेगावाताली शेतकरी सभासदांचा अवमान झाला. त्यामुळे सभासद शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. राऊत यांच्याकडे शब्द मागे घेण्याची मागणी करत नोटीसही देण्यात आली होती. मात्र प्रारंभी त्याची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे खटला दाखल करण्यात आला.

नंतरच्या काळात संजय राऊत यांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता आरोप चुकीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अद्वैत हिरे यांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे आरोप झाल्याचे राऊत यांनी माध्यमांसमोर कबूल केले. तसेच याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी मालेगावच्या शेतकरी सभासदांची दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या माफीची दखल घेत, तसेच त्यांच्या तब्येतीचा व इतर बाबींचा विचार करून संबंधित खटला मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *