रा.स्व संघाच्या संघ शिक्षा वर्गाला शुक्रवारपासून प्रारंभ
सोलापूर, ता. १६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शिक्षा वर्ग म्हणजे देशभक्तांची पिढी तयार करण्याचे कार्य आहे. आगामी काळातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हेच स्वयंसेवक पुढे नेत असतात. समाजानेही संघ कार्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य अविरत सुरू आहे असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सह कार्यवाह महेश करपे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा प्रारंभ हरिभाई देवकरण प्रशालेत झाला. याप्रसंगी ते स्वयंसेवकांना संबोधित करत होते.
या वर्गामध्ये प्रांतातून २८८ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. प्रारंभी भारतमाता पूजनाने वर्गाची सुरुवात झाली. १६ मे ते १ जूनपर्यंत हा वर्ग चालणार असून १ जूनला समारोप होणार आहे. वर्गासाठी प्रांतामधील विविध जिल्ह्यांमधून स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. रा. स्व. संघाच्या दृष्टीने २४ तर शासकीय स्तरावरील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या सात जिल्ह्यांमधून शिक्षार्थी या वर्गात सहभागी झाले आहेत.
त्यांचे वयोगटाप्रमाणे विविध समूह करण्यात आले आहेत. या वर्गात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. या वर्गाला संघाचे क्षेत्रीय व प्रांत स्तरावरील पदाधिकारी भेट देणार आहेत.
पहाटे योग, शारीरिक व्यायाम, नियुद्ध (कराटे), दंड, गटश: चर्चा, बौद्धिक, विचारमंथन, चिंतन, सायंकाळी संघस्थान असे नियोजनबद्ध कार्यक्रम वर्गात आखण्यात आलेले आहेत. त्याशिवाय सेवा, संपर्क, प्रचार या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह महेश करपे यांनी संघ शिक्षा वर्गातील नियमांबाबतची माहिती सहभागी स्वयंसेवकांना दिली. संघ शिक्षा वर्गाचे महत्त्व यावेळी सांगतानाच रा.स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांचे उद्देश विशद केले.
सर्वाधिकारी म्हणून ॲड. प्रशांत यादव, वर्ग कार्यवाह म्हणून ॲड. आनंद कुलकर्णी हे या शिक्षा वर्गाची जबाबदारी पार पाडणार आहेत. याशिवाय श्रीनिवास पुलय्या हे संघ शिक्षा वर्गाचे पालक तर अक्षय खांडेकर हे मुख्य शिक्षक असणार आहेत.
सलग पंधरा दिवस चालणाऱ्या या वर्गात स्वयंसेवकांकडे मोबाईल नसणार आहे. तसेच या वर्गात सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १०: ३० पर्यंत, वेळेचे नियोजन, शारीरिक, बौद्धिक प्रशिक्षण यासोबतच सेवाव्रत, सामाजिक समरसता या बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.