संगीत संयोजनातून स्वरबद्ध संघ प्रार्थनेच्या अभिनव ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण

नागपूर, दि. २७ सप्टेंबर : संघाची प्रार्थना हा संघाचा सामुहिक संकल्प आहे. १९३९ पासून प्रार्थनेतून या संकल्पाचे उच्चारण स्वयंसेवक रोज शाखेत करत असतात. इतक्या वर्षांच्या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचे सामर्थ्य लाभले आहे आणि ही केवळ सांगायची गोष्ट नसून प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज नागपुरात बोलताना केले.
अत्याधुनिक संगीत संयोजनातून स्वरबद्ध झालेली संघ प्रार्थना आणि तिचा विविध भारतीय भाषांमधील अर्थ निवेदन करणाऱ्या अभिनव ध्वनिचित्रफितीचा लोकार्पण सोहळा आज नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे हस्ते पार पडला. प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुप्रसिद्ध हरीश भिमानी यांचा या निर्मितीत प्रमुख सहभाग आहे. रेशीमबाग स्मृतीभवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अभिनव ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना भागवत यांनी संघप्रार्थनेचा इतिहास आणि तिचा प्रभाव उलगडून सांगितला. ते म्हणाले, संपूर्ण हिंदू समाजाने मिळून पार पाडावयाचे ध्येय या प्रार्थनेतून व्यक्त होते. यात भारतमातेची प्रार्थना आहे. त्यात पहिला नमस्कार भारतमातेला आणि नंतर ईश्वराला आहे. यात भारतमातेला काहीही मागितलेले नाही तर जे तिला द्यायचे आहे, त्याचा उच्चार आहे. जे मागायचे आहे, ते ईश्वराला. ही प्रार्थना म्हणजे फक्त शब्द किंवा त्याचा अर्थ नाही, तर भारतमातेसाठी असलेला भाव त्यातून व्यक्त होतो. १९३९ पासून आजतागायत स्वयंसेवक रोज शाखेत प्रार्थनेचे उच्चारण करतात. इतक्या वर्षाच्या या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचे सामर्थ्य लाभले आहे आणि ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. प्रार्थनेमुळे स्वयंसेवक पक्का होतो. शब्द आणि अर्थाच्या पलीकडे जाऊन या प्रार्थनेचा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचावा, असा हा उपक्रम असल्याचा उल्लेख करून भागवत पुढे म्हणाले, संघात बाल व शिशु स्वयंसेवकही आहेत. त्यांना प्रार्थनेचा अर्थ काय समजत असेल? त्यांना समजत नसेल असे नाही. शब्द व अर्थ समजत नसेलही, पण प्रार्थना हा एक भाव आहे. कुठल्याही शाखेत शिक्षकांच्या नाकी नऊ आणणारा शिशु स्वयंसेवक प्रार्थनेत मात्र दक्ष आणि प्रणामाच्या स्थितीत उभा असतो. उजव्या पायाला डास चावला तरी तो डावा हात प्रणामाच्या स्थितीत करुन उजव्या हाताचा वापर करतो. प्रार्थनेचे पहिले रूप भाव आहे. त्यात संकल्पाची दृढता आहे. मातृभूमीप्रती भक्ती-प्रेम आहे. भाव कळायला कुठलीही विद्वत्ता लागत नाही. या गोष्टी स्वयंसेवकांना समजतात. स्वयंसेवकांवर संस्कार झाले असल्याने त्यांना ही जाणीव राहते. भावाचा प्रभाव फार मोठा आहे. स्वयंसेवकाला तो कळतो. प्राथनेतून कळायला हवे ते त्यांना कळते, असेही ते म्हणाले.
संपूर्ण हिंदू समाजाच्या कार्यशक्तीचा हातभार लागेल, तेव्हाच भारतमातेला परमवैभव येईल, अशी संघाची धारणा आहे. ते व्हायचे असल्यास प्रथम भाव व नंतर अर्थ आणि शब्द असा एक प्रवाह आहे. पण, गती वाढवायची असेल, तर शब्दातून अर्थाकडे व अर्थातून भावाकडेही जायला हवे असे सांगताना भागवत यांनी प. बंगालमधील एक उदाहरण दिले. प्राथमिक शाळेचे एक संस्कृत शिक्षक रस्त्याने जात असताना काही स्वर त्यांच्या कानावर पडले. त्यांचा अर्थ व शब्दाने ते भारावून गेले. उत्सुकतेपोटी त्यांनी तेथील मुलांना विचारणा केल्यावर मुलांनी ‘आम्ही संघाचे लोक आहोत व ही आमची प्रार्थना आहे’ असे सांगितले. प्रार्थनेच्या या प्रभावामुळे ते संघाच्या शाखेत येऊ लागले व पुढे संघाचे बंगाल प्रांताचे प्रांत संघचालक झाले. ते होते केशवचंद्र चक्रवर्ती. त्यामुळे हा प्रवाह देखील सुरु व्हायला हवा आणि हा उपक्रम म्हणजे असा प्रवाह सुरु करण्याचे साधन आहे, असे भागवत म्हणाले. शब्द, अर्थ व भाव या तिन्ही गोष्टींना अनुरूप संगीताचा योग फार कमी वेळा येतो. मी पहिल्यांदा हा ट्रॅक ऐकल्यावर लगेच लक्षात आले की तो प्रार्थनेला त्या वातावरणात घेऊन जातो. इंग्लंडच्या भूमीवर तो तयार होणे हा बोनस आहे. याचा जितका प्रचार प्रसार होईल, तितके नवे लोग संघाशी जोडले जातील. संगीताचे स्वतःचे सामर्थ्य आहे. ते कानातून सरळ मनात उतरते. या उपक्रमाशी जुळलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना सरसंघचालकांनी त्यांना धन्यवाद दिलेत.
आजचा क्षण आपल्यासाठी अकल्पनीय असल्याच्या भावना सुप्रसिद्ध निवेदन हरिष भिमानी यांनी व्यक्त केल्या. सर्वात महत्त्वाची देवी ही भारतमाताच आहे. तिचे कुठेही मंदिर नाही. हे कार्य माझ्याकडून करविले गेले आहे. ते माझ्यासाठी निव्वळ अनुष्ठान नसून अर्ध्य आहे, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. ही कल्पना सर्वप्रथम भिमानी यांनीच माझ्यापुढे मांडली, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख व संगीतकार राहुल रानडे यांनी यावेळी दिली. यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात प्रार्थनेच्या हिंदी व मराठी अनुवादाच्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. लंडनच्या रॉयल फिलरमॉनिक ऑर्केस्ट्राच्या सहकार्याने ही प्रार्थना संगीतबद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी ही प्रार्थना सादर केली असून प्रार्थनेचा हिंदी व मराठी अनुवादाला अनुक्रमे हरिष भिमानी आणि सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज लाभला आहे. गुजराती आणि तेलुगु सह तब्बल १४ भारतीय भाषांमध्ये या प्रार्थनेच्या अनुवादाचे सादरीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाशी जुळलेले चितळे उद्योग समूहाचे प्रमुख इंद्रनील चितळे, अभिनेते सचिन खेडेकर, विवेक आपटे, ऋग्वेद देशपांडे, साहील देव, कमलेश भडकमकर तसेच आमदार सिद्धार्थ शिरोळे यावेळी उपस्थित होते.

