पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे हिंदू धर्म जागरणाचे महत्कार्य पुढे नेण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कटिबद्ध : विजय देवांगण

लातूर, दि. २४ फेब्रुवारी : “२०२५ हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मत्रिशताब्दी वर्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हिंदू धर्म तथा हिंदू समाज जागरणाचे महान कार्य गेल्या १०० वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारा पुढे नेले जात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सह – संपर्क प्रमुख विजय देवांगण यांनी लातूर येथे केले.

नवनिर्माण प्रतिष्ठान, लातूरद्वारा आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन येथील केशवराज विद्यालयाच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी विजयजी देवांगण यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या हिंदू धर्म जागरणाच्या ऐतिहासिक कार्यावर प्रकाश टाकला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेल्या शतकभरातील कार्याचा परिचय उपस्थितांना करवून दिला.

“आजचा आपला भारत देश आजवरच्या सर्वात सुखद कालखंडातून जातो आहे. देव-देश-धर्म जागरणामुळे राष्ट्रीय आस्था वाढीस लागली आहे. महाकुंभ मेळ्याने हे हिंदू समाजाचे विराट दर्शन दाखवले आहे. हिंदू समाज धार्मिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या एकसंघ होत आहे, यामागे छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदि महान राज्यकर्त्यांचे कार्य आणि विचार असल्याचे विजयजी देवांगण यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना या महान विभूतींचे धर्म तथा राष्ट्र जागरणाचे कार्य अखंडपणे तेवत ठेवण्याचे कार्य करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

“पती खंडेराव होळकर यांच्या मृत्यूपश्चात सून अहिल्यादेवी होळकर यांना सती जाण्यापासून सासरे मल्हारराव होळकर यांनी रोखले आणि खंबीरपणे इंदूर संस्थानचे राज्यशकट चालवण्याची प्रेरणा दिली. अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतवर्षात अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि पवित्र नद्यांवर विस्तीर्ण घाट बांधले, लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरणं आखली. महिला रोजगार, कृषि, जलसंधारण आदि क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. केवळ धार्मिकचं नाही तर उत्तम समाज निर्मितीसाठी जे जे आवश्यक म्हणून करता येईल ते त्यांनी केले, असे नमूद करुन देवांगण यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

“१९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार, श्रीगुरुजींच्या प्रेरणेने हजारो संघप्रचारक, स्वयंसेवक, कार्यकर्त्यांनी हा राष्ट्रयज्ञ तेवत ठेवला आहे. आज संघस्वयंसेवक समाजाच्या सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः राजकीय क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत आहेत. आर्थिक क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर, देशाच्या अंतर्गत – बाह्य संरक्षणात मजबूत धोरण, दळणवळणाची साधने व सुविधा यात नेत्रदीपक प्रगती तथा जागतिक स्तरावर भारताला सर्व क्षेत्रात अव्वल ठेवण्यासाठी संघस्वयंसेवक झोकून देत आहे. यासोबतच हिंदू धर्म – समाज जागृतीसाठी, हिंदूंच्या आस्था स्थानांचे पुनरुत्थान करण्यासाठी कटिबद्ध आहेत असे प्रतिपादन विजय देवांगण यांनी केले.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्योती सूळ यांनी “अहिल्यादेवी होळकर यांच्या थोर कार्याला जाणून घेण्यासाठी आज इथे उपस्थित आहे, असे नमूद केले. यावेळी व्यासपीठावर नवनिर्माण प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण सरदेशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले. डॉ शुभांगी कुलकर्णी यांच्या ‘वंदे मातरम्’ गीताने व्याख्यानमालेची सांगता झाली. या व्याख्यानासाठी परिवारातील स्वयंसेवक, कार्यकर्ते तथा मातृभगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *