राष्ट्रोत्थानासाठी शेवटच्या माणसापर्यंत संघ सक्रियपणे कार्य करत आहे : पांडुरंग बलकवडे

पुणे, दि. २ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून तळागाळात जाऊन काम करतोय. स्वातंत्र्य आंदोलनात संघाने सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच फाळणीनंतर सर्वांच्या पुनर्वसनासाठी संघाने मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने नुमवी प्रशालेत आयोजित हिंदू संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने, आमदार हेमंत रासने, नगरसेवक कुणाल टिळक, नगरसेविका स्वप्नाली पंडित आदि उपस्थित होते.

बलकवडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासावर प्रकाश टाकत संघाच्या १०० वर्षांच्या कार्याविषयी माहिती दिली.१९२५ मध्ये विजयादशमीला स्थापनेपासूनच संघाने ‘व्यक्ती निर्माण’ हे मुख्य ध्येय ठेवले. चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रप्रेमी स्वयंसेवक घडवून त्यांना समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सेवेसाठी प्रेरित करण्याचे काम तळागाळात सुरू झाले. स्वातंत्र्यलढ्यात डॉ. हेडगेवारांपासून अनेक स्वयंसेवकांनी वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर सत्याग्रहात सहभाग घेतला. १९३० चा जंगल सत्याग्रह असो वा १९४२ चे ‘चले जाव’ आंदोलन, संघ स्वयंसेवकांनी देशभक्तीच्या प्रेरणेने सक्रिय योगदान दिले. १९४७ च्या फाळणीच्या वेळी जेव्हा देश हिंसेत होरपळत होता, तेव्हा संघाने पंजाब आणि बंगालमध्ये ‘हिंदू सहाय्यता समिती’ स्थापन केली. निर्वासितांना वाचवणे, त्यांच्यासाठी छावण्या चालवणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे यामध्ये स्वयंसेवकांनी प्राणांची बाजी लावली.लातूरचा भूकंप असो, गुजरातचे चक्रीवादळ किंवा अलीकडील कोविड महामारी कोणतीही आपत्ती आल्यावर स्वयंसेवक ‘सेवा परमो धर्म:’ या नात्याने मदतीसाठी धावून जातात.समाजातील अस्पृश्यता आणि उच्च-नीच भेदभाव नष्ट करण्यासाठी संघाने मोठे कार्य केले आहे. १०० वर्षे पूर्ण होत असताना संघाने ‘स्व’ आधारित व्यवस्थेचा (स्वदेशी, स्वभाषा, स्वसंस्कृती) आग्रह धरला आहे. देशातील प्रत्येक गावात शाखेच्या माध्यमातून पोहोचून राष्ट्रोत्थानासाठी शेवटच्या माणसापर्यंत संघ सक्रियपणे कार्य करत आहे. हिंदू धर्म आणि समाज जागृत करण्याचं काम करतोय असेही ते म्हणाले.

यावेळी विश्व संवाद केंद्राच्या संपादक अंजली तागडे यांनी पंच परिवर्तन संकल्पना काय आहे याबाबत माहिती दिली. स्वबोध, नागरी कर्तव्ये, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता या पाच बिंदुंच्या आधारे संघ सकारात्मक आणि रचनात्मक कार्यावर भर देत असून प्रत्येकाने स्वतःपासून आपल्या जीवनात, समाजात हे विषय कसे रुजवायचे याविषयी माहिती दिली. तसेच यावेळी काही वैयक्तिक आणि सामाजिक संकल्प मांडून ते आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. तर डॉ. भावार्थ देखणे यांनी संत परंपरेच्या माध्यमातून हिंदू धर्म आणि आचार या विषयावर आशीर्वचन दिले.

भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि शंख वादनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी सांस्कृतिक वार्तापत्राच्या शताब्दी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. माही जोशी आणि अंतरा मिणियार यांनी गणेशवंदना, शिववंदना सादर केली. वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी रुद्रपठण केले. या हिंदू संमेलनात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सूत्रसंचालन चैतन्य कुसूरकर यांनी केले. अरुंधती शहा यांनी म्हणलेल्या संपूर्ण संपूर्ण वंदे मातरम् ने संमेलनाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *