देहत्यागानंतरही साईबाबांची तपस्या अनेकांसाठी पथदर्शक : सरसंघचालक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शिर्डी येथे घेतले साईदर्शन

शिर्डी, दि. १८ मे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबा यांचे दर्शन तसेच साईबाबा समाधी मंदिरात श्रींचे पाद्यपूजन केले.

शिर्डी विमानतळ येथून नाशिकला जाण्यापूर्वी ते साई मंदिरात आले होते. मंदिर परिसरात आगमन होताच मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भिमराज दराडे, यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी द्वारकामाई, समाधी मंदिर व गुरुस्थान येथेही दर्शन घेतले. साई मंदिरात संस्थान अधिकाऱ्यांनी श्री साई मूर्ती, श्री साई चरित्र, उदी, प्रसाद आणि शाल-श्रीफळ देऊन सरसंघचालकांचा सत्कार केला.

यावेळी सरसंघचालक भागवत यांनी आपल्या अभिप्रायात, ‘1857 च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर भारताच्या नवोत्थानाचा पाया या नात्याने भारतभर समाजाचे प्रबोधन, अध्यात्म तत्व आणि व्यवहार या मूलभूत घटकांचे प्रकटन ज्या ईश्वरीय योजनेने झाले त्याचा एक भाग म्हणजे शिर्डीचे साईबाबा होत. देह त्यागानंतरही त्यांची तपस्या अनेकांना पथ दर्शक ठरते ही प्रचिती आहे. अशा श्री बाबांचा समाधी मंदिराचा नित्य कार्य विकास व त्याचे नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींचे कृतज्ञतापूर्वक धन्यवाद.’ अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी सराला बेटाचे महंत परमपूज्य श्री रामगिरीजी महाराज यांनी सरसंघचालक यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उत्तर नगर जिल्हा संघचालक किशोर निर्मळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *