संघशताब्दी निमित्त आगामी वर्षभराच्या नियोजनावर होणार मंथन

नवी दिल्ली, दि. 24 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’चे आयोजन यावर्षी हरियाणातील समालखा येथे करण्यात आले आहे. 13, 14 आणि 15 मार्च 2026 रोजी पट्टीकल्याणा येथील ग्रामविकास आणि सेवा साधना केंद्रात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज नवी दिल्ली येथे याबाबत माहिती दिली.
संघ स्थापनेचे हे शताब्दी वर्ष असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शताब्दीनिमित्त देशभरात आयोजित करण्यात आलेले विजयादशमी उत्सव, गृहसंपर्क अभियान, हिंदू संमेलन, युवा संमेलन आणि सामाजिक सद्भाव बैठकांचा आढावा या वेळी घेतला जाणार आहे. तसेच, या अभियानांमधून आलेल्या अनुभवांवर विशेष चर्चा केली जाईल. प्रतिनिधी सभेत गेल्या वर्षभरातील (2025-26) संघकार्याचा आढावा घेतला जाईल. यासोबतच देशातील वर्तमान परिस्थितीवर चर्चा करून काही महत्त्वाचे प्रस्तावही संमत केले जाण्याची शक्यता आहे. संघाच्या शाखांच्या माध्यमातून समाजात अपेक्षित असलेले बदल आणि विशेषतः ‘पंच परिवर्तन’ या विषयावरील प्रयत्नांची व्याप्ती वाढवण्यावर यात भर दिला जाणार आहे. तसेच आगामी वर्षाची कार्ययोजना आणि कार्यकर्ता विकास वर्गांच्या प्रशिक्षणाचे नियोजनही या बैठकीत निश्चित होईल.
1400 हून अधिक पदाधिकारी :
या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले, सर्व सह-सरकार्यवाह आणि केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. याशिवाय देशभरातील विविध प्रांतांतून निवडून आलेले प्रतिनिधी आणि क्षेत्र स्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह एकूण 1489 कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहतील. तसेच संघाच्या विचारसरणीने प्रेरित असलेल्या 32 विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस आणि संघटन मंत्रीही या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.

