पुनर्निर्माणाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केल्या भावना
पुणे, दि. २ जुलै : “‘कौशिक आश्रम’ हा काही पथिक आश्रम, वृद्धाश्रम अथवा वैद्यकीय सेवेचे ठिकाण नसून, तो एक मुक्ताश्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून अधिक संख्येने ज्येष्ठ सेवाव्रतींची सोय करण्याची गरज निर्माण झाल्याने जुन्या वास्तूच्या जागी एक मोठी वास्तू उभारावी या विचाराने याच्या पुनर्निर्माणाचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी केले.
पुण्यातील मित्रमंडळ सोसायटी येथे असलेल्या कौशिक आश्रम इमारतीच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन सोमवारी झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जोशी यांच्या समवेत रा. स्व. संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेशजी भेंडे उपस्थित होते.
भैय्याजी यावेळी म्हणाले, “आपल्या जीवनाची सर्वाधिक वर्षे समाज कार्यासाठी अर्पण केलेल्या ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या पण मनानी तरुण अशा सेवाव्रतींच्या निवासाची एक उत्तम व्यवस्था म्हणून गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ ‘कौशिक आश्रम’ हा प्रकल्प कार्यरत आहे. आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने याचे भूमिपूजन झाले आहे.”
कौशिक आश्रम ट्रस्टची मित्रमंडळ सोसायटीमधील कौशिक आश्रम ही वास्तू गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ अविवाहित व कुटुंबापासून लांब राहून समाजसेवा करणाऱ्या रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ सेवाव्रती कार्यकर्त्यांसाठीची निवास योजना म्हणून कार्यरत आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी भूमिपूजन पूजा करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रकल्पाचे वास्तुविशारद पलाश देवळणकर यांनी नियोजित वास्तूची माहिती दिली. या कार्यात मोलाचा हातभार लावणारे देणगीदार हरदास पती-पत्नी आणि आशेर यांचा सन्मान कौशिक आश्रमाच्या वतीने करण्यात आला. या प्रकल्पासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांनी केले. त्यासाठी शेफाली ताईंचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते. पुढील दोन ते अडीच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निश्चय विश्वस्तांच्या वतीने या वेळी व्यक्त करण्यात आला.