पुणे, दि. २ ऑगस्ट : आपले जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी सुनीलराव खेडकर यांनी समर्पित केले. त्यांचे संघटन कौशल्य, संवाद कौशल्य आणि प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याची त्यांची वृत्ती ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या कृतीतून माणुसकी आणि संघातून एकजुटीचा मंत्र देणारा मार्गदर्शक हरपला आहे पण त्यांचे समर्पण आपल्याला कार्याची प्रेरणा देते असे मत प्रसिद्ध लेखक डॉ. रतन शारदा यांनी व्यक्त केले.
पुणे महानगराचे माजी प्रचार प्रमुख आणि ज्येष्ठ संघ स्वयंसेवक सुनीलराव खेडकर यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजच्या सभागृहात आयोजित त्यांच्या श्रद्धांजली सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, संभाजी भाग संघचालक अनिल व्यास उपस्थित होते.
शारदा पुढे म्हणाले, सुनीलराव यांचे संघटन कौशल्य केवळ माणसांना एकत्र आणण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते प्रत्येक व्यक्तीमधील सुप्त क्षमता ओळखून त्यांना योग्य न्याय देण्यासाठी धडपडणारे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते घडले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले असेही ते म्हणाले. आपल्या पुस्तक निर्मितीत सुनीलराव यांचा मोलाचा वाटा असून ‘संघ आणि स्वराज्य’ हे पुस्तक त्यांनी यावेळी खेडकर यांना समर्पित करत त्यांच्या कुटुंबियांना दिले.
यावेळी रवींद्र वंजारवाडकर म्हणाले की, सुनीलराव यांचे संवाद कौशल्य इतके प्रभावी होते की, अगदी सामान्य माणसापासून ते मोठ्या पदावरील व्यक्तींपर्यंत सर्वांशी ते सहज संवाद साधू शकत होते. त्यांच्या बोलण्यातून फक्त शब्दच नाही, तर आपुलकी आणि आपलेपणा जाणवत असे. सर्व कामात बारीकसारीक निरीक्षणे, अभ्यास आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे नियोजन ते करत असत. पुण्यात विविध ठिकाणी बाल शाखा लागण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या एका शब्दावर कोणताही कार्यकर्ता कामाला लागायचा, हे त्यांच्या संवाद कौशल्याचेच यश होते. कोणतेही काम हाती घेतल्यावर ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी होती. कामाचा पाठपुरावा करण्याची त्यांची सवय ही कामात यश मिळवण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. त्यांच्या प्रत्येक कामात स्पष्टता आणि अचूकता दिसून येत असे. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि त्यांनी घालून दिलेली मूल्यांची वाटचाल आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील असेही ते म्हणाले.
शिस्त, निष्ठा आणि समर्पण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तीन भक्कम आधारस्तंभ होते. स्थानिक तसेच प्रांत स्तरावर संघ कार्यामध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जीवन म्हणजेच सेवा, त्याग व कर्तव्यभावनेचे मूर्तिमंत उदाहरण होते. युवकांचा राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.
कुटुंबातील सर्वांचा परिचय करून घेत प्रत्येकाला विविध पद्धतीने संघ कामात कसे आणता येईल यासाठी ते फक्त कार्यकर्ता नाही तर कुटुंबाशी जोडले गेले होते. संघ कामासोबतच आपल्या व्यवसायातील त्यांची शिस्त आणि सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांना त्यांनी ‘मित्रा’ संबोधून कायम जोडून ठेवले. त्यामुळे सुनीलराव सर्वांना आपले वाटले. असे मत त्यांच्या सोबत काम केलेल्या मित्र, व्यवसायिक, प्रचार विभागातील कार्यकर्ते, कौटुंबिक हितचिंतक यांनी व्यक्त केले. सत्यजित चितळे, सुहास देव, विराज देवडीकर,रुपाली भुसारी, सार्थक शिंदे आदिंनी यावेळी मनोगत व्यक्त केले. राजू चौथाई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी खेडकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.