मुंबई, ४ जानेवारी – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होणार आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या गेल्या दोन वर्षांत चर्चेत आल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र नंतर ते गुन्हे रद्द करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या निकटवर्तीय समजल्या जातात.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने २९ डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वांत आधी रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. रश्मी शुक्ला यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, त्यानंतर राज्य सरकार त्यांना मुदतवाढ देऊ शकते.
रश्मी शुक्ला या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. सशस्त्र सीमा बलाचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. याआधी पुणे पोलीस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूर डीसीपी या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यानंतर त्यांची राज्य गुप्तचर विभागात आयुक्त म्हणून बदली झाली होती.