पैठण, दिनांक 20 ऑगस्ट : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पैठण तालुक्यातून हिंदू बांधवांचा आणि विशेष करून हिंदू महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. सुरुवातीला मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाला. त्यानंतर महाराणा प्रताप यांचे अभिवादन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अभिवादन करण्यात आले.
पुढे सर्व सहभागी हिंदू नागरिकांसोबत खंडोबा मंदिर चौक येथे तयार करण्यात आलेल्या मंचावर मान्यवर स्थानापन्न झाले. त्याप्रसंगी मंचावर अध्यात्मिक क्षेत्रातील संत मंडळी संत एकनाथ महाराज यांचे वंशज ह. भ. प. योगेश महाराज पालखीवाले, ह. भ. प. नवले महाराज, ह. भ. प. नवल महाराज, ह. भ. प. प्रफुल बुवा तळेकर महाराज यांची उपस्थिती होती.
मोर्चामध्ये कमलेश कटारिया यांनी अत्यंत प्रेरणादायी शौर्यपूर्ण उदाहरणांनी भरलेले असे व्याख्यान दिले. बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदू समाजावरील अत्याचारांना त्यांनी वाचा फोडली. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचार ते केवळ हिंदू आहेत म्हणून होत आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. याप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप व इतर महापुरुष यांची उदाहरणे दिली, आणि त्यांनी दाखवून दिले की, आपण या इस्लामिक जिहादी कारवायांच्या विरोधात कसे सजग असले पाहिजे.
सदर प्रसंगी प्रशासनाला निवेदन देण्यात आले की, बांगलादेश मधील हिंदू मंदिरांवर आणि नागरिकांवर होत असलेले हल्ले त्वरित थांबले पाहिजे, केंद्र व राज्य शासन यांनी लव जिहाद व धर्मांतराच्या विरोधात कडक कायदा आणावा, याप्रसंगी अशीही मागणी करण्यात आली की, तूर्तास बांगलादेशातील हिंदू नागरिक यांना भारतात शरण द्यावी. परंतु बांगलादेशातील हिंदू नागरिकांसाठी बांगलादेशचे दोन वेगळे देश निर्माण करण्यात यावे, त्यातील एक केवळ हिंदूंसाठी असावा. सदर मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडून स्वीकारण्यात आले. अशाप्रकारे अत्यंत आक्रोश पूर्ण वातावरणात मोर्चाची सांगता झाली.