राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव

नागपूर, १४ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे, श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा नागपूर ट्रस्टतर्फे आयोजित ‘राजरत्न पुरस्कार सोहळा – 2026’ येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने 24 वर्षे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या माध्यमातून राजरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला जात आहे.

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा पूर्वेकडे विस्तार करून स्वराज्याला अधिक बळकट केले. अनेक स्वाऱ्या केल्या, अनेक महत्त्वाची युद्धे जिंकली. तसेच जगन्नाथ मंदिराचे पुनर्निर्माण करून बंद पडलेल्या प्रथा पुन्हा सुरु केल्या. त्यामुळे ओडिसाच्या संग्रहालयामध्ये नागपूरकर भोसले घराण्याच्या आठवणी पाहायला मिळतात. तसेच गोंड राजांनी नागपूरला शहराचे रूप दिले आणि भोसले घराण्याने नागपूरला सुनियोजित शहर म्हणून विकसित केले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. श्रीमंत राजे रघुजी यांची तलवार महाराष्ट्र सरकारने भारतात आणली आणि लवकरच ती नागपूरला आणली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मंत्री संपतिया उईके (मध्य प्रदेश), श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम), श्रीमंत राजे मुधोजी भोसले, प.पू. गुरु माऊली अण्णासाहेब मोरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *