Wednesday, September 13th, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी केला ‘आयुष्मान भव’ मोहिमेचा प्रारंभ

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आयुष्मान भव हा एक मोठा उपक्रम म्हणून उदयास येईल. : डॉ. मांडविया

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी मोहिम आयुष्मान भव आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ही मोहिम तसेच आयुष्मान भव पोर्टलचा शुभारंभ केला. गुजरातमधील गांधीनगर येथील राजभवन येथून दूरदृश्य प्रणालीमार्फत त्यांनी ही मोहिम सुरू केली. यावेळी राष्ट्रपतींसोबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, राज्यांचे राज्यपाल तसेच राज्यांचे आरोग्य मंत्री उपस्थित होते.

आयुष्मान कार्डचा वापर अधिक सुलभ करणे, आभा (ABHA) ओळखपत्र तयार करणे तसेच असंसर्गजन्य रोग, क्षयरोग आणि सिकल सेल आजार यासारख्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करणे, याशिवाय महत्त्वाच्या आरोग्य योजना आणि रोग परिस्थितींबद्दल जागरुकता वाढवणे या आयुष्मान भव योजनेच्या उद्दिष्टांची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

आरोग्य सेवा प्रयत्नांना राष्ट्रपती देत असलेल्या समर्थनाचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मांडविया यांनी यावेळी बोलतांना कौतुक केले. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात “सबका साथ सबका विकास” सह आयुष्मान भव हा एक मोठा उपक्रम म्हणून उदयास येईल, असे आरोग्यसेवेसंदर्भात सरकारची वचनबद्धता अधोरेखित करताना डॉ.मांडविया म्हणाले. कुणालाही मागे न ठेवता सर्वांना सोबत घेऊन चालायचे’ या ब्रीदवाक्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. “आयुष्मान भव उपक्रमाच्या सोबतीने भारत आरोग्यसेवा परवडणारी आणि सुलभ बनवण्याच्या क्षेत्रात एक नवीन अध्याय लिहिणार आहे, असेही ते म्हणाले. आयुष्मान भव अंतर्गत, आरोग्य मेळावे आणि वैद्यकीय शिबिरांचे आयोजन हा एक महत्त्वाचा घटक असून आठवड्यातून एकदा सर्व आरोग्य आणि कल्याण केंद्र (HWC) आणि सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) यामध्ये आरोग्य मेळावे आणि वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाईल.” असे ते पुढे म्हणाले. “आयुष्मान भव उपक्रम सुरू करण्याबरोबरच, अवयवदान आणि रक्तदान प्रतिज्ञा मोहिमा देखील आयोजित केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. प्रतिज्ञा मोहीम एक उदात्त उपक्रम असून प्रत्येक व्यक्तीने अवयव आणि रक्तदान प्रतिज्ञा घेतली पाहिजे.” असे आवाहन त्यांनी केले.

संसद सदस्य, विधानसभा सदस्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. ५० लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत जोडले गेले होते. या लोकांनी हा प्रारंभ सोहळा ऑनलाइन पाहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *