सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ₹22,181 कोटींच्या कामांना मंजुरी

मुंबई, दि. 13 मार्च : नाशिक – त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन 2027 मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे ‘नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ संदर्भातील शिखर समितीची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत त्र्यंबक–नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध कामांसाठी ₹22,181 कोटींच्या कामांना बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ₹5140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील ₹17,041 कोटींच्या कामांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्यासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. नाशिक रिंग रोडच्या मार्गातील अडथळे दूर करीत विशेष बाब म्हणून 50 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. तसेच स्वच्छता व दर्जेदार शौचालयांवर विशेष भर द्यावा. नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांच्या पायाभूत सुविधा विकसित करताना त्यात निफाड रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्याबाबत रेल्वेने पडताळणी करून कार्यवाही करावी.
कुंभमेळा निमित्त सुरू असलेली आणि प्रस्तावित असलेल्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दाम विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
कुंभमेळ्याची तयारी करताना शिर्डी–नाशिक रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे. भाविकांसाठी मोबाईल संपर्क व्यवस्था भक्कम करावी, तसेच द्वारका जंक्शन परिसरातील रस्त्यांचा एकीकृत विकास करावा. याशिवाय नवीन घाटांच्या जागेसाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड व नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभमेळ्यादरम्यान शुद्ध राहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नाशिक येथील काळाराम मंदिराचे काम करताना वाहतूक सुरळीत ठेवावी, राम काल पथाचे काम गतीने पूर्ण करावे, तसेच ऑप्टिकल फायबर व सीसीटीव्ही व्यवस्था तातडीने कार्यान्वित करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी. नाशिक शहर व परिसरातील जवळपास 2000 ते 4000 युवकांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी प्रेरित करावे. तसेच महिला बचत गटांच्या कुंभमेळ्यातील समावेशनाबाबत पडताळणी करून तशा पद्धतीचे बिझनेस मॉडेल उभारावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह नाशिक मधील विधिमंडळ सदस्य व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

