मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. परिणय फुके व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ओबीसी समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी नवीन योजना राबवून नव्या पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने महाज्योती संस्थेची स्थापना करण्यात आली.

ओबीसी मुलांसाठी 60 हून अधिक वसतिगृह सुरू करण्यात आली असून, त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बिनव्याजी ₹15 लाख पर्यंतचे कर्ज देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. पीएचडी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण सुरू करणे आदी उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले असून महाज्योतीची उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
घरापासून वंचित राहिलेल्या ओबीसी कुटुंबियांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू असून समाजातील अनुसूचित जाती-जमातींसह ओबीसी समाजाचा विकास करणे ही राज्याची जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाज्योतीच्या तयार होणार्या अत्याधुनिक इमारतीच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी सर्वसमावेशक व्यवस्था उभारली जाऊन, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळून त्यांना गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

