नवी दिल्ली, २७ एप्रिल : “देशाची एकता आणि १४० कोटी भारतीयांची एकजूट हीच दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१व्या भागात देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाचे मन व्यथित झाले आहे. देशाच्या कोणत्याही भागातील नागरिक असो, कोणतीही भाषा बोलणारा असो, सर्वांच्या भावना हल्ल्यातील पीडित कुटुंबांप्रती आहेत.”
दहशतवाद्यांच्या या कृत्याचा तीव्र निषेध करताना पंतप्रधानांनी सांगितले की, “ज्यांनी हा कट रचला आणि या हल्ल्याला खतपाणी घातले, त्यांना अतिशय कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. पीडित कुटुंबांना नक्कीच न्याय मिळेल.”
काश्मीरमध्ये स्थिरता आणि विकास दिसू लागल्यानंतर, देशविघातक शक्तींना ते खपले नाही, आणि म्हणूनच हा कट रचण्यात आला, असेही मोदी म्हणाले. “शाळा-महाविद्यालयांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते, पर्यटनाला चालना मिळाली होती, लोकशाही बळकट होत होती. मात्र, दहशतवाद्यांनी या सकारात्मक बदलाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जगभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत असून अनेक जागतिक नेत्यांनी भारताला सहानुभूतीचे आणि पाठिंब्याचे संदेश दिले असल्याची माहितीही मोदींनी दिली. “दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग आज भारतासोबत खंबीरपणे उभे आहे,” असे ते म्हणाले.