पुणे, दि. २ : राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित ‘महिला जन सुनावणी’ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पिडीत महिला उपस्थित होत्या.
श्रीमती रहाटकर म्हणाल्या, राष्ट्रीय महिला आयोगाकडे देशातील विविध भागातून पिडीत महिलांच्या तक्रारी प्राप्त होत असतात. या महिलांना दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात येण्याजाण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करता ‘राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत राज्याच्या राजधानी तसेच विभागनिहाय ‘महिला जन सुनावणी’ आयोजित करण्यात येत असून त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. येत्याकाळात लवकरच महिला जन सुनावणीची शंभरी पूर्ण होणार आहे. या सुनावणीत सर्व संबधित विभागाच्यामदतीने पिडीत महिलांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. त्यामुळे महिलांच्या तक्रारीची प्रशासनाने गार्भियांने दखल घेवून तक्रारी मार्गी लावण्याकरीता पारदर्शकपणे कामे करावीत.
श्रीमती रहाटकर यांच्या समक्ष सुनावणीसह सुरुवात करण्यात आली, आज झालेल्या महिला जन सुनावणीत आयोगाकडे एकूण ३५ प्राप्त तक्रारी, तसेच ऐनवेळी आलेल्या २१ तक्रारीची दखल घेवून कार्यवाही करण्यात आली. यातील २० तक्रारीबाबत जागेवरच निर्णय घेण्यात आले तर उर्वरित प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित तक्रारीची दखल घेण्याचे श्रीमती रहाटकर यांनी निर्देश दिले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा बिरारीस यांनी केले.