कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापीच्या तळघरात मध्यरात्री झाली पूजा
वाराणसी, १ फेब्रुवारी : वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात पूजा सुरू करण्यात आली. तसेच आज, गुरुवारी पहाटे मंगला आरतीही झाली. न्यायालयाने तब्बल 31 वर्षांनंतर हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली आहे. व्यासजींच्या तळघरात सध्या सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंदी आहे. पूजेच्या वेळी फक्त पुजारी येण्याची परवानगी असेल.
जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टाने बुधवारी 31 जानेवारी रोजी व्यास कुटुंबीय आणि काशी विश्वनाथ ट्रस्ट बोर्डाच्या पुजारी यांना तळघरात असलेल्या मूर्तींची पूजा व आरती करण्याचे आदेश दिले होते. सेटलमेंट प्लॉट क्रमांक 9130 येथे असलेल्या इमारतीच्या दक्षिणेला असलेल्या तळघरात पुजाऱ्याकडून मूर्तींची पूजा आणि राग-भोग करून घेण्याचे निर्देश जिल्हा न्यायाधीशांनी रिसीव्हर जिल्हा दंडाधिकारी यांना दिले. तसेच 7 दिवसांत लोखंडी कुंपणाची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचनाही रिसीव्हरला देण्यात आल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांनी गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी न्यायालयात दावा दाखल करून व्यासजींचे तळघर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्याची आणि डिसेंबर 1993 पूर्वीप्रमाणे पूजा करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीकडून तळघर बळजबरीने ताब्यात घेतले जाण्याची भीती दाव्यात व्यक्त करण्यात आली होती. गेल्या 17 जानेवारी रोजी जिल्हा न्यायाधीशांनी व्यासजींच्या तळघरात जिल्हा दंडाधिकारी यांना रिसीव्हर केले होते. तसेच बुधवारी पूजेला परवानगी देऊन दुसरी मागणीही मान्य करण्यात आली.
ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघराबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ धाम येथे पोहोचले. व्यासजींच्या तळघरात पूजेची व्यवस्था करण्याबाबत जिल्हा न्यायाधीश न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मात्र, यासंदर्भात विचारणा केली असता, कोणताही पोलीस किंवा प्रशासन अधिकारी औपचारिकपणे काहीही बोलण्यास तयार नव्हते. अनौपचारिकपणे अधिकाऱ्यांनी सरळ सांगितले की, न्यायालय जो काही आदेश देईल, त्याचा अभ्यास करून नियमानुसार त्याचे पालन केले जाईल.
काशी विश्वनाथ मंदिरासमोरील रस्ता कापून व्यासजींच्या तळघरापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एएसआयच्या पाहणी अहवालानुसार मूर्ती तळघरात ठेवण्यात आल्या असून तेथे त्यांची पूजा करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आज, गुरुवारी सकाळपासून व्यासजींच्या तळघरात विधीनुसार नियमित पूजा करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कौशल राज शर्मा यांनी सांगितले. सर्व अधिकारी अजूनही काशी विश्वनाथ धाममध्ये आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी रात्री उशिरा विश्वनाथ धाम येथे पोहोचले होते.