आषाढी वारी निमित्त विविध मार्गांवर ‘जिज्ञासा’तर्फे आरोग्य सेवा शिबिरांचे आयोजन

पुणे, २७ जून: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा मानबिंदू आहे. या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिज्ञासा आयामाचे विद्यार्थी मागील ९ वर्षांपासून करत आले आहेत. या वर्षीच्या वारीसाठी ठिकठिकाणाहून दिंडींने पंढरपूरसाठी प्रस्थान केले आहे. याही वर्षी जिज्ञासाचे विद्यार्थी वारीत सेवाकार्य करणार असल्याची माहिती अभाविपतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे जिज्ञासा सहसंयोजक रचित गादेकर यावेळी बोलताना म्हणाले की, AYUSH (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) च्या पारंपरिक चिकित्सा पद्धतींचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वांना परवडेल अशा प्रकारचे उत्तम वैद्यकीय शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी अभाविपचा जिज्ञासा हा आयाम संपूर्ण भारतात कार्यरत आहे. जिज्ञासा आपल्या Learn ‘AYUSH To Practice AYUSH’ ह्या बोधवाक्यासह विद्यार्थी केंद्रित व समाजोपयोगी विविध उपक्रम राबवते.

यंदाच्या वर्षी वारी प्रमुख असलेल्या वैदेही आपटे म्हणाल्या की, प्रत्येकाला समाजाप्रति संवेदना, सामाजिक जाणीव ही असतेच परंतु आपल्यासारखा वैद्यकीय पेशा असताना आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावा, डॉक्टर हा समाजासाठी असतो, हे वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच मनामध्ये रुजावे आणि या करीता विविध वैद्यकीय शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि डॉक्टरांना कृतीशील करावे या हेतूने जिज्ञासा द्वारे हे आरोग्य व सेवा शिबिर चालू करण्यात आले. एका पत्र्याच्या शेड मध्ये १५ जणांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा उपक्रम आता पुणे, निगडी, सासवड, बारामती, लोणंद, तरडगाव, फलटण, इंदापुर, माळशिरस, अकलूज, वेळापूर, वाखरी, पंढरपूर अशा ठिकाणांपर्यंत विस्तारला आणि यातील वैद्य व विद्यार्थ्यांची उपस्थिती ही १०-१५ पासून सुरू होऊन ५०, १००, २५० असा करता करता मागच्या वर्षी (२०२३) १५७० डॉक्टरांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांचे तसेच काही बाहेर राज्यातील विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होतात.

या आषाढी वारी सेवा उपक्रमाअंतर्गत आळंदी, पुणे तसेच सासवड, बारामती, लोणंद, फलटण, इंदापूर, माळशिरस, अकलूज, वेळापूर, वाखरी व पंढरपूर या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाचे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर राबविण्यात येणार आहेत. या वैद्यकीय सेवा शिबिरांचे वैशिष्ट्य असे की या मध्ये वापरण्यात येणारी चिकित्सा प्रणाली व औषधे ही प्रामुख्याने आयुर्वेद व होमिओपॅथी या शास्त्रांमध्ये वापरण्यात येणार आहेत. त्यामध्ये आयुर्वेदातील अग्निकर्म, विद्धकर्म या चिकित्सा पद्धतींचे विशेष शिबिर देखील समाविष्ट असतील.

चिकित्सेबरोबरच समाजात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, व्यसनाधीनता, अवयवदान याकरिता समाजात जागृती व्हावी यासाठी सामान्य ग्रामीण जणांना समजेल अशा ग्रामीण भाषेत पथनाट्ये उत्कृष्टपणे सादर केली जातील. महिलांमध्ये अधिक प्रमाण असलेल्या ऍनिमिया सारख्या व्याधी बद्दल प्राथमिक माहिती, कारणे, आहारात पदार्थ काय घ्यावेत, काय काळजी घ्यावी या संबंधी पत्रके वाटण्यात येतील. मागील वर्षी आषाढी वारी वैद्यकीय सेवा शिबीर अंतर्गत एकूण ६०,१२९ वारकऱ्यांना सेवा देण्यात आली व एकूण डॉक्टर्स व विद्यार्थ्यांची संख्या ही १५७० इतकी होती.

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यावेळी म्हणाले की, “शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे, विद्यार्थी जीवन आनंदमय होण्यासाठी अनेक उपक्रम राबवणे, याच सोबत सर्व विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती सेवाभाव निर्माण करण्यासाठी देखील अभाविप आपल्या विविध आयामांमार्फत विविध उपक्रम राबवते. जिज्ञासा ही त्यातीलच एक आहे. वारीत करण्यात येणाऱ्या या आरोग्य व सेवा शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे मी त्यांना आवाहन करतो.”

प्रा. डॉ. शरद गोस्वामी यांनी यावेळी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *