चौथ्या विश्व मराठी संमेलन २०२६ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकमध्ये उद्घाटन

नाशिक, दि. २७ फेब्रुवारी : राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग एआयचा वापर करून आपले साहित्य सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल, याकरिता प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी एआयचा वापर करून लँग्वेज लॅब तयार करत आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिक येथे चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मान्यवर व हजारोंच्या संख्येने नाशिककर साहित्यरसिक उपस्थित होते.
नाशिकमध्ये यावर्षी ‘भाषेचा कुंभ’ भरला असून पुढील वर्षी ‘संस्कृतीचा कुंभ’ भरणार आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या समस्त मराठी जणांना सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण देतो असे सांगत फडणवीस पुढे म्हणाले, विविध देशांमधून आलेले मराठी बांधव त्या-त्या देशांमध्ये मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत.

मराठी माणूस कधीही संकुचित विचार करत नाही; तो नेहमी व्यापक दृष्टिकोन ठेवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असतो. अशाच प्रतिभावान व्यक्तींना आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांचे महत्त्व आणि महात्म्य दोन्ही अधिक अधोरेखित झाले आहे. या व्यक्तींमुळे मराठीचा रथ असाच अविरत पुढे जात राहील आणि मराठीचे सर्व सारस्वत मराठी भाषेला व अस्मितेला जीवंत ठेवतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
नाशिकची भूमी ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देखील भूमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषा शुद्धीकरणाचे काम केले. महापौर, विधानसभा, विधान परिषद यासह असे अनेक शब्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिले असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी भाषाविषयक कार्याचाही गौरव केला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याप्रसंगी म्हणाल्या, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकची भूमी ही कुसुमाग्रजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ही भूमी संतांची आणि विचारवंतांची आहे. याच मातीत जन्मलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या ओव्यांमधून मराठी जगण्याचा गंध दिला. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपल्या अस्मितेचा श्वास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात असंख्य कष्टकरी, कामगारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या त्यागामुळे आपण आज मराठी भाषेची महती अभिमानाने सांगू शकतो, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. गेल्या वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. अशा पद्धतीने मराठी भाषेचा गौरव वाढवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री पवार यांनी याप्रसंगी आभार मानले.
दरम्यान आजच्या उदघाटन प्रसंगी मराठी भाषा विभागामार्फत व राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले गेले. यामध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार, श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, शांतिब्रम्ह गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तर राज्य मराठी विकास संस्थेतर्फे डॉ. दिलीप धोंडगे यांना अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांना अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्था), विनोद कुलकर्णी यांना मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुर्गी यांना मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्था) व निर्मल प्रकाशन, नांदेड यांना श्री. पु. भागवत पुरस्कार (संस्था) देऊन गौरविण्यात आले.

