महाराष्ट्र नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : केंद्राचे २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून राज्य नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ही प्रगती शक्य होत असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस यांनी सांगितले की, नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी अतिदुर्गम भागांत नवीन पोलीस चौक्या उभारून आवश्यक मनुष्यबळ व सुविधा द्याव्यात. नक्षलवाद कमी झालेल्या भागांत नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्याणकारी शिबिरे, शासकीय योजनांचे वितरण, युवकांसाठी रोजगार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याच्या अनुषंगाने राज्यस्तरीय समितीची बैठक विधानभवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी माहिती दिली की बक्षीस घोषित नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे घडत आहे. गडचिरोली पोलिसांनी जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण घडवून आणल्याबद्दल १ कोटी रुपये बक्षीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि नक्षलविरोधी कामगिरीत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी.

गडचिरोलीत नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे काम सुरू करण्यास, त्यासाठी निधी उपलब्ध करण्यास, तसेच दलासाठी ३३ नवीन वाहनांच्या खरेदी प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मनीषा व मिलिंद म्हैसकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी सादरीकरण केले.

लाहेरी येथे नक्षल्यांनी आनंद साजरा केलेल्या ठिकाणीच पोलिसांनी नवीन चौकी उभारली आहे. ८ ऑक्टोबर २००९ रोजी झालेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर नक्षल्यांनी आनंदोत्सव केला होता. आता त्याच ठिकाणी चौकी निर्माण झाल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे.

गडचिरोलीतील विकासकामांनाही वेग मिळत आहे. १७.३० किमी लांबीचा धोडराज–निलगुंडा–कवंडे रस्ता, कोरमा नाला व बेद्रे पूल, तसेच इंद्रावतीवरील ७५० मीटर पुलाचे काम हाती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील संपर्कव्यवस्था बळकट करण्यासाठी २०२२ पर्यंत असलेल्या २७१ मोबाईल टॉवरांबरोबरच २०२३–२५ मध्ये ५२१ नवीन टॉवर उभारण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *