कल्याण आश्रमद्वारे आयोजित युवा कुंभात स्वामी अवधेशानंद जी यांचे विचार
प्रयागराज, दि. ६ फेब्रुवारी : जसे आपण सर्व जनजाती बांधव आपली रूढी, परंपरा, संस्कृती सोबत घेऊन सहजतेने महाकुंभात आले आहात, त्याचप्रमाणे संतांनीही वन जीवनाची निर्मलता व साधेपणा अनुभवण्यासाठी वारंवार वनांमध्ये जावे लागेल. जनजाती समाजाशी समरसता साधल्या शिवाय सनातन संस्कृतीचे हे महाकुंभ पूर्ण होणार नाही, असे विचार स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांनी येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमतर्फे पवित्र प्रयागराज महाकुंभात आयोजित युवा कुंभात आशीर्वचन देताना स्वामी अवधेशानंद जी यांनी हे विचार मांडले. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही सर्व संत आणि जे आरण्यक संस्कृतीची जबाबदारी मानतात, त्यांनी वारंवार वनांमध्ये जाऊन आपल्या जनजाती बांधवांशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्यासोबत भोजन करावे लागेल. कारण आपण सर्व जण सनातन परंपरेचे अविभाज्य घटक आहोत.
या प्रसंगी महामंडलेश्वर स्वामी रघुनाथ बाप्पाजी महाराज (फरशी वाले बाबा), केंद्रीय जनजाती कार्य राज्यमंत्री दुर्गादास ऊईके, कल्याण आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान, पद्मश्री चैतराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे परिचय व स्वागत करण्यात आले.
या युवा कुंभाचे बीज भाषण करताना राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान यांनी कुंभाचे महत्त्व व जनजाती समाजाच्या अस्मिता आणि अस्तित्वाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. सनातन संस्कृतीचे प्रतीक असलेला हा महाकुंभ खऱ्या अर्थाने आरण्यक संस्कृतीच्या चैतन्याचा मूळ स्वरूप आहे, असे विचार त्यांनी मांडले.
महामंडलेश्वर रघुनाथबाप्पा फरशी वाले यांनी आपले विचार स्पष्ट करताना सांगितले की, जनजाती समाज हा सनातन परंपरेचा अविभाज्य भाग आहे आणि कोणीही त्याला वेगळे करू शकत नाही. निसर्गासोबत राहणे, फळे-फुले व नैसर्गिक संसाधनांसह जीवन जगणे, ही एक अनुभूती आहे, जी या कुंभात प्रत्ययास येते.
भारत सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्री दुर्गादास ऊईके यांनी आपल्या विचारांमध्ये सांगितले की, काही असामाजिक शक्ती जनजाती समाजाला बहकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे शक्ती सोशल मीडिया आणि विचारधारा यांचे शस्त्र म्हणून वापरत आहेत. त्याविरुद्ध लढण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. इतिहास साक्षी आहे की, तरुणांनी जेव्हा संघर्षाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा परिवर्तन घडले. त्यामुळे वनवासी तरुणांनी या संदेशासह आपल्या क्षेत्रात परिवर्तन घडवावे.
कल्याण आश्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधत सांगितले की, आपला समाज व संस्कृती याबाबत आपली प्रतिमा सक्षम असायला हवी. त्यासाठी अभ्यास, संघर्षशीलता आणि नेतृत्व क्षमता विकसित करणे गरजेचे आहे.
देशभरातून आलेल्या युवा जनजातींच्या या संमेलनात काही प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. त्यामध्ये लक्ष्मणराज सिंह मरकाम, जितेंद्र ध्रुव, मीना मुर्मू, डॉ. राम शंकर उराव, अरविंद भील आदींचा समावेश होता. युवा महाकुंभ 2025 चा संदेश म्हणून मध्य प्रदेश सरकारचे अधिकारी लक्ष्मण सिंह मरकाम यांनी हिंदी व इंग्रजीत घोषणापत्र सादर केले. या घोषणापत्रात सात महत्त्वाचे बिंदू नमूद करण्यात आले, जे जनजाती क्षेत्रातील तरुणांनी आपल्या जीवनात आत्मसात करायचे आहेत.
वनवासी कल्याण आश्रमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित समाजसेवक चैतराम पवार यांचा विशेष सन्मान स्वामी अवधेशानंद यांनी केला. तसेच जनजाती क्षेत्रात निपुणतेने कार्य करणाऱ्या १६ तरुण कार्यकर्त्यांचा देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम अत्यंत गौरवशाली वातावरणात पार पडला. देशभरातील विविध क्षेत्रांतून आणि प्रांतांतून हजारो युवक यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ प्रांताचे फिरोज ऊईके यांनी केले. भजन सादरीकरणासोबतच तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेशच्या कार्यकर्त्यांनी नृत्य व संगीताचे सुंदर सादरीकरणही केले.