Saturday, September 28th, 2024

कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. २८ : कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा कृषी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. रविवार (२९) रोजी सायं. ५ वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित केल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कोविड तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षातील एकूण 448 पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार (1), वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (8), जिजामाता कृषी भूषण पुरस्कार(8), कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार(8), वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार (8), उद्यान पंडित पुरस्कार(8), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (40), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार(10), युवा शेतकरी पुरस्कार(8), अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजनेतील पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.

कृषी पुरस्कारांच्या रकमेत चार पट वाढीचा निर्णय कृषी मंत्री मुंडे यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये घेतला असून पुरस्कार विजेत्यांना उपस्थित राहण्यासाठी दैनिक प्रवास भत्ता रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास शेतकरी-नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *