आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान

पुणे, दि. 17 फेब्रुवारी : “पाश्चात्य परंपरेत इतरांना दडपून टाकण्यासाठी शस्त्र म्हणून ज्ञानाचा विचार केला जातो. भारतीय परंपरेत मात्र प्रत्येक व्यक्तीला श्रेष्ठ, सुखी, संपन्न, निरामय बनवण्यासाठीचे शास्त्र म्हणून ज्ञानाकडे बघितले जाते. आपल्या परंपरेत ज्ञान लादले जात नाही तर व्यक्तीच्या ठायी असलेल्या ज्ञानाची जाणीव त्याचा करून दिली जाते, हे भारतीय ज्ञान परंपरेचे वैशिष्ट्य आहे,” असे प्रतिपादन ‘प्रज्ञा प्रवाह’ संस्थेचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी येथे बोलताना केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीदिनी ‘भारतीय ज्ञान परंपरा : यशाकडे नेणारा मार्ग’ या विषयावर नंदकुमार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
नंदकुमार पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरेप्रमाणेच जगात विविध ज्ञान पंरपरा आहेत. परंतु, त्या परंपरांनी स्थल-काल-सापेक्ष विचार केला. भारतीय ज्ञान परंपरेने मात्र संपूर्ण सृष्टीचा विचार केला हे तिचे मोठेपण आहे. त्यामुळेच भारताला गुरुस्थानी मानणारी आणि पूर्वापार चालत आलेली ज्ञान परंपरा चीनमध्ये आजही अस्तित्वात आहे. तेथील राजकीय विचारसरणीमुळे अद्याप ती विकसित झालेली नाही. स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकाचवेळी ब्रह्म तत्वापासून अस्तित्वात आल्याची धारणा असल्यामुळे भारतीय परंपरेत स्त्री-पुरुष समानता ही अंगभूत आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत पुरुषापासून स्त्री ची निर्मिती आणि पुरुषासाठी स्त्रीचे अस्तित्व ही धारणा असल्याने त्यांच्याकडे स्त्रियांचे शोषण होत आले आहे. संघर्षमय जगाला शांती मिळवून देण्याची क्षमता फक्त भारतीय ज्ञान परंपरेत आहे.
ज्ञान म्हणजे काय, ते प्राप्त करण्याची व्यवस्था काय आणि त्याचे वेगळेपण कोणते हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. दर्शन, ज्ञान आणि विद्या म्हणजे ज्ञान अशी ज्ञानाची व्याख्या आहे. दर्शन किंवा दृष्टीकोन यांच्या आधारे केलेला विचार ज्ञानाकडे घेऊन जातो आणि या दर्शनाच्या आधारे सुसंघटित किंवा सुनियोजित पद्धतीने विशिष्ट विषयाचे ज्ञान मिळविल्याने विद्या प्राप्त होते. भारतीय ज्ञान हे केवळ अध्यात्मिक नाही. भारतीय ज्ञान पंरपरेत कधीही नष्ट न होणारे म्हणजे परा किंवा अ-क्षर ज्ञान आणि अपरा म्हणजेच भौतिक ज्ञान असे विद्येचे दोन प्रकार आहेत. पाश्चात्यांनी आपल्याकडील ज्ञानाची केवळ चोरीच केली नाही तर त्यावर आपला हक्क सांगितला. त्यांनी आपल्या देशातील ज्ञानी व्यक्तींचा बुद्धीभेद केला. भारतीय ज्ञान हे भौतिक नाही, ते वास्तववादी नाही असा भ्रम पसरवला. संस्कृत भाषा असो की आपली ग्रंथसंपदा पाश्चात्यांनी सर्व काही विद्रुप केले. भारतीय समाजाला आत्मविस्मृतीत ढकलले. 14 विद्या, 64 कला आणि उपकला अशी समृद्ध ज्ञान परंपरा असलेल्या भारताबद्दल कोणतीही माहिती नसताना पाश्चात्यांनी आपल्यावर त्यांचे ज्ञान लादले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतकेंद्री शिक्षण व्यवस्थेचा आग्रह धरण्यात आला आहे, मात्र ते अद्याप पूर्णपणे लागू झालेले नाही.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना बाबासाहेब शिंदे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून असलेला राष्ट्रीय शिक्षण देण्याचा हेतू आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय ज्ञान परंपरेचे एक नाते असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली पण भारतीय ज्ञान परंपरेशी फारकत घेतली. केवळ अध्यात्मच नाही तर गणित, विज्ञान, खगोलशास्त्र अशी विविध शास्त्रे यांचा शिक्षणात समावेश होता. ते शिकविणारी नालंदा, तक्षशीला यासारखी जगद्विख्यात विद्यापीठे आपल्या देशात होती. आपल्या देशात मोठ-मोठे शोध लागत होते. जगभर होणाऱ्या व्यापारामुळे देशात समृद्धी नांदत होती. भारताने लावलेला शून्याचा शोध, देशातील मंदिरे, लेण्यांचे स्थापत्य हे सर्वकाही अचंबित करणारे आहे. त्यांचा विसर पडू नये म्हणून नव्या शैक्षणिक धोरणाचा उपयोग होणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात अतिशय जलद गतीने होणारे बदल, पाश्चात्यांचा भांडवलवादी दृष्टीकोन, अपयशी ठरलेला साम्यवादी विचार या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय विचार अतिशय महत्वाचा आहे. भारतीय ज्ञान परंपरा शिक्षणाशी जोडली जात असताना तिचा नव्याने उहापोह व्हावा या हेतूने आजचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नेहा देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.

