कमला हॅरिस यांच्या नावाची पक्षाकडे केली शिफारस
वॉशिंग्टन, दि. २१ जुलै : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज आगामी निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. राष्ट्राला संबोधत त्यांनी एक पत्र आज जारी केले. त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. गेल्या साडेतीन वर्षांपासून अमेरिकेच्या जनतेने आपल्याला साथ दिल्याबद्दल त्यांनी अमेरिकेच्या जनतेचे आपल्या पत्रातून आभार मानले. इतिहासात कधीही नव्हती इतकी अमेरिका आज सामर्थ्यशाली व बलवान झाली आहे असा दावा त्यांनी या पत्रातून केला आहे. आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख बायडेन यांनी या पत्रात केला आहे. तसेच अध्यक्षपदाच्या उर्वरित काळात आपण आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान बायडेन यांच्या या माघारीमुळे जागतिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. बायडेन यांच्या ऐवजी पक्ष आता कोणाला पुढे आणणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे नाव सध्या सर्वाधिक आघाडीवर आहे. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांचेही नाव चर्चेत आहे. किंबहुना बायडेन यांनी हॅरीस यांच्याच नावाला पसंती देत त्यांच्या नावाची शिफारस पक्षाला केली आहे. ओबामा यांना असलेले आफ्रिकन अमेरिकन, हिस्पॅनिक, भारतीय समुदाय अशा विविध समाजघटकांचे समर्थन पाहता त्यांना उमेदवारी मिळाल्यास ट्रम्प यांच्यासाठी ही निवडणूक अधिक अवघड होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.