
देहू, दि. 17 फेब्रुवारी : वृक्षदाई प्रतिष्ठान निर्मित जगद्गुरु अभंगगाथावन महत्वपूर्ण उपक्रम असून गावोगावी असे अभंगवन, ज्ञानेश्वरीवन तयार झाले पाहिजेत, ही लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. श्रीक्षेत्र देहू येथील अभंगवनात वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे विश्वस्त, वृक्षदाई संस्थेचे अध्यक्ष, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा मापुस्कर, पर्यावरण संरक्षण गतिविधीचे विवेक देशपांडे, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, वृक्षदाईचे विश्वस्त कैलास पानसरे यांचेसह विविध मान्यवर, वृक्षदाई संस्थेचे सदस्य, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पर्यावरणपूरक कार्यक्रमात सुरुवातीला 5 देशी झाडांचे रोपण, पूजन करण्यात आले यावेळी एकच लक्ष – देशी वृक्ष यासह संत ज्ञानेश्वरमाऊली – तुकोबारायांचा जयघोष करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संघ कार्याचा गौरव करून या वनात 100 झाडांचे रोपण करण्यात येणार असल्याचे वृक्षदाईतर्फे सांगण्यात आले.
निसर्गातील परस्परांचे सहस्तित्व मान्य करणारी, चराचरात ईश्वर मानणारी आपली भारतीय संस्कृती कायमच निसर्गाला ईश्वरस्वरूप मानत आली आहे. सर्वे भवंतू सुखिन: ही भारतीय संस्कृतीची शिकवण पुन्हा एकदा जगमान्य होत आहे. निसर्गाशी एकत्व सांगणारी आपली संस्कृती, परंपरा अशा विविध उपक्रमातून पुढे नेण्याचे आवाहन लिमये यांनी केले. वृक्षदाई संस्थेचे कौतुक करीत वृक्षदाईने असे अभिनंदनीय उपक्रम गावोगावी सुरू व्हावेत याकरिता विविध संस्थांना दिशा दाखविण्याचे, त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विकास कंद यांनी, सूत्रसंचालन बळीराम लोकरे यांनी, वक्ते परिचय संतोष हगवणे यांनी तर आभार विलास बोऱ्हाडे यांनी मानले.
वृक्षदाईनिर्मित जगद्गुरु अभंग गाथावनात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 4538 अभंगाऐवढे देशी जातीचे वृक्ष लागवडीचा संकल्प असून काम सुरू आहे. वृक्षदाई संस्थेकडून प्रेरणा घेऊन अनेकविध संस्थांनी अशाच प्रकारचे देशी झाडांचे वन तयार करण्याचा ध्यास घेतला आहे.

