प्रख्यात लेखक व ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांच्या पुण्यातील व्याख्यानास प्रचंड प्रतिसाद

पुणे, दि. 11 मार्च : “सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे,” असे मत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटर येथे आयोजित ‘मूलभूत इस्लामची शिकवण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत व राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कुराण समजून घेण्यासाठी प्रेषित पैगंबरांचे चरित्र वाचणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून प्रा. शेषराव मोरे म्हणाले की, “प्रेषितांच्या चरित्रातून कुराणातील कोणती आयत कोणत्या प्रसंगात आली आहे, याचा बोध होतो. आज काही आयतांचा वापर ‘इस्लाम सहिष्णू आहे’ हे दाखवण्यासाठी केला जातो. मात्र, प्रत्यक्षात इस्लामला अल्लाशिवाय दुसरी कोणतीही श्रद्धा मान्य नाही. संपूर्ण जगाला इस्लामिक दृष्टिकोनातून श्रद्धावान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. अल्लाला न मानणाऱ्यांना शिक्षा देण्याचा अधिकारही ते स्वतःकडेच घेतात. इस्लामची शक्ती वाढल्यानंतर ‘काफिरां’विरुद्ध जिहाद करणे तिथे अनिवार्य मानले जाते.”
अध्यक्षीय भाषणात प्रदीप रावत म्हणाले, “इस्लाम केवळ वेगळा पंथ किंवा पूजापद्धती नाही. त्यामुळे इस्लामच्या प्रश्नाकडे हिंदूंच्या सहिष्णू दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे ठरते. मुस्लिमांकडे इस्लामच्या नजरेतूनच पाहायला हवे; कारण जगाच्या पाठीवर सहिष्णू समाजाचा असहिष्णू प्रवृत्तींशी संघर्ष अनिवार्य झाला आहे, तरच सहिष्णूता टिकेल. जोपर्यंत आपण आपला ‘सिव्हिलायझेशनल डीएनए’ (सांस्कृतिक वारसा) समजून घेत नाही, तोपर्यंत हा प्रश्न आपल्याला उमजणार नाही.”
मक्का आणि मदिना संदर्भ :
सुरुवातीच्या काळात मक्केमध्ये प्रेषितांचा इस्लाम स्वीकारणाऱ्यांची संख्या अल्प होती. त्यावेळी कुराणात आलेल्या आयत आणि मदिनेमध्ये इस्लामचे संख्याबळ वाढल्यानंतर आलेल्या आयत यांच्यात मूलभूत फरक आहे, अशी माहिती प्रा. शेषराव मोरे यांनी दिली. इस्लामचे सहिष्णू रूप दाखवण्यासाठी प्रामुख्याने मक्केतील आयतांचा संदर्भ दिला जातो; मात्र मदिनेमध्ये संख्याबळ वाढल्यानंतर, जे अल्लावर श्रद्धा ठेवत नाहीत (अश्रद्धावान), त्यांच्या विरोधात ‘जिहाद’ अनिवार्य आहे, असा संदेश आयतांमधून मिळतो, असेही त्यांनी नमूद केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विवेक विचार मंच, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, भारत विकास परिषद व प्रवाह फाउंडेशन द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रणव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

