बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू : भारत आणि महाराष्ट्र!

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : जागतिक आर्थिक व्यवस्थेची नव्याने पुनर्रचना सुरू असताना भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज मुंबई येथे ‘ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026’ च्या उदघाटन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जागतिक व्यापार, पुरवठा साखळी, ऊर्जा, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच बदलत्या भूराजकीय संरचनेच्या नव्या समीकरणांमध्ये भारत आज एक निर्णायक आणि प्रभावी इंजिन म्हणून उदयास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठ्या बाजारपेठेपासून विश्वासार्ह रणनीतिक भागीदारापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. G20 अध्यक्षपद, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, IMEC आर्थिक कॉरिडॉर आणि ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज म्हणून भारताने नव्या जागतिक व्यवस्थेत सक्रिय भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्राच्या भूमिकेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र भारताच्या GDP मध्ये सुमारे 14-15% योगदान देतो, औद्योगिक उत्पादनात जवळपास 20% वाटा उचलतो आणि पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांमार्फत 60% पेक्षा अधिक कंटेनर वहन हाताळतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून RBI, BSE, NSE, NPCI यांसारख्या प्रमुख संस्थांचे केंद्र आहे. ‘भारत ही विकासाची प्रेरणादायी कहाणी असेल, तर महाराष्ट्र हा त्या विकासाचा आधारस्तंभ आहे.’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
IMEC, इंडो-पॅसिफिक समुद्री फ्रेमवर्क, वाढवण बंदर, जेएनपीटी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि समर्पित मालवाहतूक मार्ग यांमुळे महाराष्ट्र जागतिक आर्थिक कॉरिडॉरचा पश्चिमेकडील ‘अँकर’ बनण्यास सज्ज आहे. राज्यात EV, ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, संरक्षण उत्पादन, हरित हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जेमध्ये मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळत आहे असे फडणवीस यांनी सांगितले.
शाश्वत पायाभूत सुविधा, ग्रीन बाँड्स, म्युनिसिपल बाँड्स आणि सार्वभौम निधी भागीदारीद्वारे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सज्ज आहे. आर्थिक सार्वभौमत्व म्हणजे आत्मनिर्भरतेसह सहकार्य, तसेच आम्ही टिकाऊ भागीदारी शोधत आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

