
मुंबई, दि. 17 फेब्रुवारी : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी या द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी भारतामध्ये एअरबस एच 125 हेलिकॉप्टरसाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या असेंब्ली लाईनचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांच्यासह दोन्ही देशांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत आणि फ्रान्सचे संबंध विश्वासावर आधारित आहेत. फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली या भागीदारीला अभूतपूर्व गती आणि ऊर्जा मिळाली आहे. आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत ही भागीदारी केवळ धोरणात्मक नसून जागतिक स्थैर्य आणि प्रगतीसाठीची भागीदारी ठरेल. हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे उद्घाटन हे परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. फ्रान्सच्या सहकाऱ्याने माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार होणार असून ते जागतिक बाजारपेठेत निर्यातही केले जाणार आहे. 2026 हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी निर्णायक ठरणार आहे. अलीकडेच युरोपियन यूनियनसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे भारत-फ्रान्स व्यापार संबंधांनाही मोठी चालना मिळणार आहे. ‘इंडिया फ्रान्स इयर्स ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमांतर्गत संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अवकाश आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग, स्टार्टअप्स, एमएसएमई, विद्यार्थी आणि संशोधक यांच्यासाठी संयुक्त इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. क्रिटिकल मिनरल्स, बायोटेक्नॉलॉजी आणि अॅडव्हान्स मटेरियल्समध्ये सहकार्य वाढवले जाणार असून ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर एआय इन हेल्थ’, ‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ आणि एरोनॉटिक्स कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.”

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यावेळी म्हणाले, “भारत–फ्रान्स सहकार्य अधिक दृढ होत असून परस्पर विश्वास, खुलेपणा आणि महत्त्वाकांक्षा या आधारावर ही भागीदारी पुढे जात आहे. दोन्ही देशांनी या संबंधांना पुढील टप्प्यावर नेण्यासाठी विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी स्वीकारली आहे. तसेच तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्य यातही समान भूमिका स्वीकारली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत–युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा ठाम पाठिंबा आहे. दहशतवादाविरोधात संयुक्त प्रयत्न आणि दहशतवादी संघटनांचा निषेध करण्यावर फ्रान्स आणि भारताची समान भूमिका आहे. भारत–फ्रान्स भागीदारी ही स्थिर, विश्वासार्ह आणि दोन्ही देशांच्या जनतेच्या हितासाठी परिणामकारक ठरत असून भविष्यात ती अधिक प्रभावी करण्याचा दोन्ही देशांचा निर्धार आहे. लवकरच फ्रान्स–भारत नवोपक्रम नेटवर्क, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संयुक्त केंद्र स्थापन केले जाणार आहे.”

