युद्धग्रस्त अशांत जगात बुद्धविचारच मार्गदर्शक : एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 5 एप्रिल : बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात असे याप्रसंगी नमूद केले. त्यामुळे संपूर्ण जगात युद्धामुळे अशांतीचे वातावरण असताना बुद्धांचे विचारच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे आज करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

“नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय” या मंत्रोच्चारांनी भारलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी शिंदे यांनी भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे असे मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी शिंदे यांनी धम्म परिषदेकडून ‘बौद्ध रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. तसेच यावेळी शिंदे यांच्या हस्ते सर्व बौद्ध भीखुंना धम्मदान, संघदान देण्यात आले व समाजातील काही मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे, तसेच भन्ते रत्नप्रिय थेरो, विशुद्धारत्न महाथेरो, विनय बोधी महाथेरो, शांतीप्रिय थेरो, भंते डॉ. राजरत्न थेरो, रत्नप्रिय थेरो, तसेच बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *