गणित हे सर्व विज्ञानाचे विज्ञान : अविनाश धर्माधिकारी

भारतीय विचार साधनाच्या ‘अविनाशी बीज’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दि. २० जानेवारी : गणित हे सर्व विज्ञानाचे विज्ञान आहे. इंग्रजांनी भारतीयांना स्वतःच्या संस्कृती आणि परंपरेबद्दल न्यूनगंड निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली. परंतु भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यास करताना भारतीय परंपरेमधील शास्त्रशुद्ध विचार समोर येतो असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

भारतीय विचार साधन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अविनाशी बीज’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक मूळ’ The Imperiseble Seed’ या डॉ. भास्कर कांबळे लिखित पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद डॉ. श्रीराम चौथाईवाले आणि आनंद विधाते यांनी केला आहे. पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी आणि चाणक्य मंडलाचे संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी धर्माधिकारी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि भारतमाता पूजनाने झाली. या प्रसंगी भारतीय विचार साधना पुणे प्रकाशनाचे कार्यवाह काशीनाथ देवधर आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक सोलापूरकर यावेळी उपस्थित होते.

धर्माधिकारी पुढे म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून प्राचीन भारतीय गणिताचा शास्त्रशुद्ध विचार आणि तत्वज्ञान मांडले आहे. त्याचा उपयोग आपण आणि भावी पिढीला निश्चितच होईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, “पुस्तक लेखन अत्यंत ससंदर्भ आहे. त्यामुळे ते अधिक अभ्यासपूर्ण झाले आहे. आणि उत्कृष्ट संदर्भमूल्य असणारे हे पुस्तक मराठीतून आल्याने गणिताची भारतीय परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर हे पुस्तक जर नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत Indian Knowledge System (भारतीय ज्ञान प्रणाली) या विषयासाठी वापरले गेले तर ते अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल.”

पुस्तकाचे अनुवादक आनंद विधाते म्हणाले, “जागतिक ज्ञान प्रणालीच्या व्यवस्थेत असणाऱ्या अनेक विषयांच्या शाखांचा उगम हा भारतातून झाला आहे. पण हे अनेक वर्षे मान्य केले गेले नाही. इंग्रजांचा वसाहतवाद संपला तरीही मानसिक वसाहतवाद पुढची अनेक वर्षे सुरूच राहिला. आणि पश्चिम म्हणेल तीच पूर्व दिशा असा प्रवास सुरु राहिला. या प्रवासाची दिशा बदलणारे हे पुस्तक आहे.” तर डॉ. श्रीराम चौथाईवाले म्हणाले, “भारतातील संतपरंपरेप्रमाणे गणिताची परंपरा देखील मोठी व प्राचीन आहे. तात्विक आणि लौकिक दृष्टीने भारतीयांनी गणिताचा अभ्यास केला.” गणिताला असणारा तत्त्वज्ञानाचा पाया यावेळी त्यांनी स्पष्ट केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी बिडवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *