Thursday, September 14th, 2023

काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीकडून पुन्हा एकदा माध्यमांची गळचेपी, ‘प्रश्न विचारणाऱ्या’ पत्रकार-संपादकांवर बहिष्कार

माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने नेहमी गळे काढणाऱ्या… मोदी-शाहांना हिटलर, हुकुमशाह म्हणणाऱ्या… उजव्या विचारसरणीच्या लोकांना प्रश्न नको असतात असा आरोप करणाऱ्या… सर्व डाव्या, तथाकथित पुरोगामी पक्ष आज पत्रकार-संपादकांची यादी जाहीर करून त्यांच्यावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली आहे. इंडी आघाडीची बैठक काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झाली. त्यानंतर सर्व पक्षांद्वारे यासंदर्भात एक संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आले आहे.

बहिष्कार घालण्यात आलेल्या अँकर-पत्रकार-संपादकांमध्ये अदिती त्यागी (भारत एक्सप्रेस), अमन चोप्रा (नेटवर्क १८), अमिश देवगण (न्यूज18), आनंद नरसिंहन (CNN-News18), अर्णब गोस्वामी (रिपब्लिक टीव्ही), अशोक श्रीवास्तव (डीडी न्यूज), चित्रा त्रिपाठी (आज तक), गौरव सावंत (आज तक), नाविका कुमार (टाइम्स नाऊ/टाईम्स नाऊ नवभारत), प्राची पाराशर (इंडिया टीव्ही), रुबिका लियाकत (भारत २४), शिव आरूर (आज तक), सुधीर चौधरी (आज तक), सुशांत सिन्हा (टाईम्स नाऊ नवभारत) यांचा समावेश आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाने या माध्यम बहिष्काराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. इंडी आघाडीचा हा नाझीवाद आहे, हिटलरशाही आहे असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. “अजूनही काँग्रेसची आणिबाणीची मानसिकता बदललेली नाही. सध्या इंडी आघाडी दोनच कामे करत आहे… एक म्हणजे सनातन धर्मावर आघात करणे आणि माध्यमांची गळचेपी करणे.” अशा शब्दांत नड्डा यांनी इंडी आघाडीच्या या निर्णायाचा समाचार घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाचे माध्यम अनिल बलूनी यांनी देखील एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे इंडी आघाडीतील घटक पक्षांच्या या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या कृत्याद्वारे इंडी आघाडीची नकारात्मक व हुकुमशाही मनोवृत्ती प्रदर्शित होते. जनतेचा आवाज दाबण्याचा घमंडिया आघाडीचा हा प्रयत्न असल्याची टीका भाजपने केली आहे. यापूर्वीही देखील आणिबाणीच्या वेळी माध्यमांची अशीच गळचेपी केली होती. काँग्रेस अद्यापही आणिबाणीच्या मनःस्थितीतून बाहेर आलेली नाही. मात्र आता देशात भाजपचे राज्य असल्यामुळे माध्यमांनी निर्भयपणे वार्तांकन करावे असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

इंडी आघाडीमध्ये देशातील २९ पक्षांचा समावेश आहे. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका देशभरात झाल्या आहेत. इंडिया आघाडीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी आणि जागावाटपाच्या मुद्द्याबाबत पुढील बैठक भोपाळमध्ये घेतली जाण्याचे जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *