
पुणे, दि. १३ ऑक्टोबर : अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने उद्योजकता मेळावा पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर सामाजिक समरसता मंचाचे प्रांत प्रमुख डॉ. रमेश पांडव, समाज नेते ॲड. एकनाथ जावीर, संघटक ज्ञानेश्वर जावीर, राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील भंडगे आदी उपस्थित होते. डॉ. कांबळे यांच्या हस्ते सुमारे होलार समाजातील ६७ उद्योजकांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. कांबळे म्हणाले, अनुसूचित जातीच्या ५९ जातीतील २६ व्या क्रमांकावर असलेल्या होलार समाजातील उद्योजक पुढे येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. केंद्र सरकारने ९ हजार आठशे कोटी अनुसूचित जातीच्या उद्योगांना चालना देण्यासाठी निधी उभा केला आहे. १७०० कोटीचे भांडवल टाटा उद्योगसमूहाने दलित उद्योगांना उपलब्ध करून दिले, त्यामुळे अनेक उद्योजक पुढे येत आहेत. संविधानामुळे आरक्षणातून नोकरी आणि राजकीय आरक्षण दलित समाजाला मिळाले, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या समाजावर खूप मोठे उपकार आहेत.

डॉ. पांडव यांनी सांगितले की, ‘होलार समाजाने आता मागे राहून चालणार नाही. होलार जातीच्या चुकीच्या नोंदी खोडून काढल्या पाहिजेत. उद्योगांकडे वळणाऱ्यांसाठी जिल्हा उद्योग मेळावे घेऊन शासनाच्या योजना तरुणांपर्यंत पोहोचवा, समाजातील प्रत्येक जण स्वतःच्या पायावर उभा राहून सक्षम झाला पाहिजे.’
अध्यक्षीय भाषणात समाज नेते ॲड. एकनाथ जावीर यांनी सांगितले की, होलार समाज आजही विकासापासून दूर आहे. जातीच्या चुकीच्या नोंदींमुळे होलार समाजाचे नुकसान झाले आहे. शासनाने आता समाजाच्या मागण्या मान्य करताना, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळात होलार समाजाची उपकंपनी केल्याने आम्ही विकासासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण शासन आमच्या पाठीशी राहील, असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी समाजातील यशस्वी उद्योजकांचा सत्कार पद्मश्री डॉ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला तर होलार समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीमंत करडे यांना डॉ. रमेश पांडव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक सतिश गेजगे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा. सतिश केंगार यांनी करून दिला. यानंतर मोठ्या संख्येने वधूवर मेळावा पार पडला. सुमारे एक हजार समाज बांधव उपस्थित होते.


